नाशिक : ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस पशुधन घटत असल्यामुळे शेणखत मिळत नसल्यामुळे मेंढ्याच्या लेंडी खताला मागणी वाढू लागली आहे. पूर्वी प्रत्येक घरापुढे गायी, म्हशी, बैल, शेळ्या मेंढ्या मोठ्या प्रमाणात असत. त्यांना चरण्यासाठी भरपूर रान होते. पाऊसही भरपूर पडत होता. त्यामुळे शेतीसाठी शेणखत भरपूर मिळत असे.
काळानुसार बागायती शेतीचे प्रमाण वाढले व शेतीसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध झाल्याने घरापुढील पशुधन कमी झाले. यांत्रिक साधनांनी शेती केली जाऊ लागल्याने बैलाची संख्याही कमी झाली. आता थोड्याच शेतकऱ्यांकडे बैल आहेत. त्यामुळे शेणखत कमी झाल्याने मेंढयांच्या लेडी खतावर शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागत आहे.
खरीप पिकाची कापणी झाली असून आता शेतकरी रबी पिकासाठी जमीन तयार करण्याचे काम चालू आहे. यात जमिनीची नांगरणी आणि वखरणी करून त्यात शेणखत मिळवण्याचे काम चालू आहे. रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची पोत सुधारण्यासाठी शेणखत फार महत्त्वाचे असते. त्यामुळे सध्या शेणखताच्या शोधामध्ये शेतकरी फिरताना दिसून येत आहेत.
शेणखत मिळणे दुर्मीळ झाल्याने आता सुरत येथे भाजीपाला विक्रीसाठी जाणाऱ्या ट्रकवाल्यांना परत येताना शेणखत घेऊन येण्याची विनंती केली जाते. परंतु एक ट्रक शेणखताची किंमत पंधरा हजारांवर गेल्याने सर्वसामान्य शेतकऱ्याला ते परवडत नसल्याने तो लेंडी खताकडे वळला आहे.
मेंढपाळ व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर
देवळा तालुक्यातील खामखेडा परिसरामध्ये पूर्वी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मेंढीपालन व्यवसाय केला जात असे. त्यामुळे मेंढ्यांचे कळप मोठ्या प्रमाणात होते. हे कळप शेतांमध्ये बसवून त्याचा मोबदला म्हणून धान्य किंवा पैसा मिळत असे. आता खामखेडा परिसरातील मेंढपाळ व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
खरीप हंगाम संपल्यावर माळमाथा परिसरातील मेंढपाळ मेंढ्यांसह भटकंतीसाठी घर सोडतो. चाऱ्याच्या बदल्यात विनामूल्य मेंढ्या बसविल्या जातात आणि या मेंढ्यांमुळे शेतात मलमूत्र पडल्यामुळे जमिनीची पोत सुधारून उत्पादनात वाढ होते.
