जळगाव : 'शेतकरी कर्ज निवारण योजना २०२६' अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, त्यातील तब्बल २६ हजार ४३७ शेतकऱ्यांची कर्जमाफी आता तांत्रिक कारणामुळे टांगणीला लागली आहे. या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांचे आधार कार्ड आणि बँक खात्याचा तपशील सादर न केल्याने जिल्हा बँकेच्या पोर्टलवर त्यांची नोंदणी रखडली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वारंवार आवाहन करूनही हजारो शेतकऱ्यांनी अद्याप कागदपत्रे जमा केलेली नाहीत. ७, १४ आणि १७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहीर निवेदनांनंतरही प्रतिसाद न मिळाल्याने आता बँकेने आर या पार ची भूमिका घेतली आहे. जर तातडीने कागदपत्रे दिली नाहीत, तर संबंधित शेतकरी या योजनेतून कायमचे बाद होऊ शकतात.
शेतकरी दादा, हे कराच... अन्यथा स्वतः जबाबदार!
जिल्हा उपनिबंधक, बँकेचे संचालक आणि कार्यकारी संचालकांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, आधार कार्डची प्रत आणि बँक खाते क्रमांकाचा पुरावा (पासबुक/चेक) आपल्या गावच्या विविध कार्यकारी सहकारी संस्थेत (सोसायटी) किंवा जिल्हा बँकेच्या जवळच्या शाखेत सादर करावेत.
वेळेत कागदपत्रे न दिल्यास कर्जमाफी मिळणार नाही आणि त्यास शेतकरी स्वतः जबाबदार राहतील. यामध्ये बँक किंवा सोसायटीची कोणतीही कायदेशीर जबाबदारी राहणार नाही, असे बँकेने म्हटले आहे.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभमिळावा, हाच आमचा प्रयत्न आहे. मात्र, आधार आणि बँक तपशिलाशिवाय पोर्टलवर नोंदणी करणे अशक्य आहे. ही शेवटची संधी असून शेतकऱ्यांनी तातडीने सहकार्य करावे.
- संजय पवार, चेअरमन, जिल्हा बँक
