भूषण सुके
नागपूर जिल्ह्यात किमान आधारभूत किंमत (MSP) दराने धान खरेदी करण्याची प्रक्रिया आता हळूहळू वेग घेत असल्याचे चित्र आहे. राज्य शासनाच्या पणन महासंघामार्फत जिल्ह्यात सुरू असलेल्या धान खरेदी केंद्रांवर ३० डिसेंबरपर्यंत एकूण ६४,२९९.२० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली असून, यासाठी १,६५१ शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष धान विक्री केली आहे. यंदा जिल्ह्यातील ४४,८०९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.(Dhan Kharedi)
सन २०२५-२६ च्या खरीप हंगामात नागपूर जिल्ह्यात ९६,९९८ हेक्टर क्षेत्रावर धानाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये सुमारे ६५ टक्के क्षेत्र बारीक धान (लेट व्हेरायटी) तर ३५ टक्के क्षेत्र जाड्या धानाचे (अर्ली व्हेरायटी) आहे.(Dhan Kharedi)
जाड्या धानाला खुल्या बाजारात बहुतांश वेळा एमएसपीपेक्षा कमी दर मिळत असल्याने, अशा धान उत्पादक शेतकऱ्यांचा कल शासनाच्या हमीभाव खरेदीकडे अधिक असतो.(Dhan Kharedi)
७ तालुक्यांत २७ खरेदी केंद्रे
यंदा पणन महासंघाने नागपूर जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये एकूण २७ धान खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. यामध्ये मौदा तालुक्यात सर्वाधिक १४ केंद्रे, रामटेक तालुक्यात चार, भिवापूर, उमरेड, कुही व पारशिवनी या तालुक्यांमध्ये प्रत्येकी दोन, तर कामठी तालुक्यात एक खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. याशिवाय आदिवासी विकास महामंडळामार्फत रामटेक तालुक्यात दोन स्वतंत्र खरेदी केंद्रे कार्यरत आहेत.
उशिरा सुरू झाली खरेदी प्रक्रिया
शासन निर्देशानुसार १५ नोव्हेंबरपासून धान खरेदी केंद्र सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, सुरुवातीला शेतकऱ्यांच्या ऑनलाइन नोंदणीचा प्रतिसाद कमी राहिल्याने बहुतांश केंद्रे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतरच कार्यान्वित झाली. सध्या सर्व केंद्रांवर नोंदणीसह प्रत्यक्ष धान खरेदी सुरू असून, आवक हळूहळू वाढत असल्याचे दिसून येत आहे.
नोंदणीत हमलापुरी केंद्र अव्वल
धान विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीमध्ये हमलापुरी (ता. रामटेक) येथील खरेदी केंद्र अव्वल ठरले आहे. या केंद्रावर २९ डिसेंबरपर्यंत ४,१०४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. कुही तालुक्यातील चिपडी केंद्रावर ३,५३०, तर रामटेक तालुक्यातील महादुला केंद्रावर ३,११६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
खरेदीत चिपडी केंद्र आघाडीवर
प्रत्यक्ष धान खरेदीच्या बाबतीत चिपडी (ता. कुही) येथील खरेदी केंद्र आघाडीवर आहे. या केंद्रावर ३० डिसेंबरपर्यंत ५७३ शेतकऱ्यांकडून १६,५०० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे.
घोटीटोक (ता. रामटेक) येथील केंद्रावर १५,४९७.६० क्विंटल, तर धानोली (ता. मौदा) येथील केंद्रावर ९,४९७.२० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे.
१५ केंद्रांवर अद्याप शून्य खरेदी
जिल्ह्यातील २७ खरेदी केंद्रांपैकी फक्त १२ केंद्रांवर धान खरेदी सुरू झाली असून, उर्वरित १५ केंद्रांवर अद्याप एकही क्विंटल खरेदी झालेली नाही. यामध्ये मौदा तालुक्यातील मौदा, चाचेर, खात, रेवराल, निमखेडा, अरोली, कोदामेंढी, निसतखेडा, खर्डा, रामटेक तालुक्यातील रामटेक, उमरेड तालुक्यातील उमरेड, पारशिवनी तालुक्यातील डुमरी व खेडी आणि कामठी तालुक्यातील पळसाड या केंद्रांचा समावेश आहे.
नोंदणीस ३१ जानेवारीपर्यंत मुदत
शासनाने धान विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीस ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. सर्व खरेदी केंद्र संचालकांनी या कालावधीत शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करावी.
कोणत्याही परिस्थितीत ऑफलाइन अर्ज स्वीकारू नयेत, तसेच शासन निर्णयातील सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश जिल्हा पणन अधिकारी अजय बिसने यांनी दिले आहेत.
ऑनलाइन नोंदणीला ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. सर्व संस्थांनी या कालावधीत शेतकऱ्यांची नोंदणी करावी. शासन निर्णयातील सूचना व निर्देशांचे काटेकोर पालन करावे. कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांकडून ऑफलाइन नोंदणी अर्ज स्वीकारू नये. - अजय बिसने, जिल्हा पणन अधिकारी, नागपूर