Desi Seed Bank : राज्यातील लोप पावत चाललेल्या स्थानिक देशी वाणांचे संवर्धन करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. (Desi Seed Bank)
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (Mahabeej) यांनी अकोला येथे देशी वाणांच्या बियाण्यांची विशेष बँक सुरू केली असून आतापर्यंत राज्यातील १८१ देशी वाणांचे बियाणे संकलित करण्यात आले आहे.(Desi Seed Bank)
या उपक्रमामुळे स्थानिक पिकांचे जतन होण्यासोबतच शेतकऱ्यांना हवामानाशी सुसंगत बियाणे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
संकरित बियाण्यांमुळे देशी वाण धोक्यात
अलीकडच्या काळात संकरित बियाण्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे पारंपरिक देशी वाणांची लागवड कमी होत असून अनेक भागांतील स्थानिक बियाणे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
देशी वाण हे हवामानाशी जुळवून घेणारे, पोषणमूल्यांनी समृद्ध आणि टिकाऊ असल्याने त्यांचे संवर्धन गरजेचे बनले आहे.
याच पार्श्वभूमीवर अकोल्यातील पैलपाडा केंद्रात १० फेब्रुवारीपासून देशी वाणांच्या बियाण्यांची बँक सुरू करण्यात आली आहे.
१८१ देशी वाणांचे संकलन
या बियाणे बँकेत सध्या राज्यातील विविध भागांतील १८१ देशी वाणांचे बियाणे जतन करण्यात आले आहे. त्यामध्ये धान्य, कडधान्य, तृणधान्य, भाजीपाला आणि मसाला पिकांचा समावेश आहे.
या बियाण्यांमध्ये ज्वारी, बाजरी, गहू, मका, हरभरा, मूग, उडीद, तूर, नाचणी, सावा, राजमा यांसारख्या पारंपरिक पिकांच्या देशी जातींचा समावेश करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
या बियाणे बँकेच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील देशी वाणांचे संरक्षण करण्यासोबतच भविष्यात संबंधित बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची योजना आहे.
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक देशी बियाणे पिकांसाठी अधिक अनुकूल ठरू शकतात. त्यामुळे उत्पादन टिकवून ठेवण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे.
हवामान अनुकूल व पोषणयुक्त बियाण्यांवर भर
संशोधन तज्ज्ञांच्या मते देशी वाण ही कमी खर्चात आणि प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता असलेली पिके आहेत. त्यामुळे भविष्यात अन्नसुरक्षा आणि शाश्वत शेतीसाठी देशी वाणांचे संवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे.
या उपक्रमाबाबत माहिती देताना संशोधन विभागप्रमुख डॉ. प्रफुल्ल लहाने यांनी सांगितले की, राज्यातील लोप पावत असलेल्या स्थानिक बियाण्यांचे जतन करण्यासोबतच शेतकऱ्यांना हवामान अनुकूल आणि पोषणमूल्यांनी समृद्ध बियाणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
शाश्वत शेतीसाठी महत्त्वाचे पाऊल
देशी वाणांच्या बियाण्यांचे संवर्धन केल्यामुळे जैवविविधता टिकवून ठेवण्यास मदत होणार असून भविष्यातील शेती अधिक शाश्वत आणि सुरक्षित करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. तज्ज्ञांच्या मते अशा बियाणे बँकांमुळे स्थानिक पिकांचे संरक्षण होण्यास मोठी मदत होऊ शकते.
