पुरुषोत्तम करवा
आजच्या स्पर्धात्मक युगात उच्चशिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या शोधात धाव घेणे हेच यशाचे मोजमाप मानले जाते. मात्र बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील ३० वर्षीय तरुण शेतकरी अनिकेत अशोक डक यांनी या चौकटीबाहेर जाऊन विचार केला आणि शेतीतूनच शाश्वत व दीर्घकालीन उत्पन्नाचा मार्ग निवडला.(Date Palm Farming)
उच्चशिक्षण, पण नोकरी नाही
अनिकेत डक यांचे वडील राजकारणात सक्रिय असतानाही त्यांनी राजकारणात प्रवेश न करता उच्चशिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित शेती सांभाळण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
आपल्या परिसरातील बहुतांश शेतकरी ऊस, कापूस, सोयाबीन यांसारख्या पारंपरिक पिकांकडे वळलेले पाहून 'आपण काहीतरी वेगळे करावे' हा विचार त्यांच्या मनात रुजला.
गुजरात दौऱ्याने बदलली दिशा
गुजरातला पर्यटनासाठी गेले असताना अनिकेत यांनी तेथील खजूर शेती प्रत्यक्ष पाहिली. वाळवंटी परिस्थितीतही जोमाने वाढणारे खजुराचे पीक, कमी पाण्यात येणारी लागवड आणि दीर्घकाळ उत्पन्न देणारी शेती पाहून त्यांनी खजूर लागवडीचा निर्णय घेतला. केवळ पाहून न थांबता त्यांनी गुजरातमध्ये जाऊन खजूर शेतीबाबत सविस्तर माहिती घेतली.
बीड जिल्ह्यात पहिलाच प्रयोग
गुजरातहून सुमारे ३०० खजुराची रोपे आणून अनिकेत डक यांनी माजलगाव तालुक्यातील चार एकर शेतात खजूर लागवड केली. मराठवाडा विभागात आणि विशेषतः बीड जिल्ह्यात हा प्रयोग पहिल्यांदाच होत असल्याचे मानले जाते. सध्या खजुराची झाडे ३ ते ४ फूट उंचीपर्यंत वाढली असून लागवड यशस्वी होत असल्याचे दिसत आहे.
खर्च जास्त नाही, फायदा दीर्घकाळ
खजुराची रोपे सुरुवातीला महाग असली तरी इतर पिकांच्या तुलनेत त्यावर होणारा खर्च कमी असल्याचे अनिकेत सांगतात. महिन्यातून एकदा खत व आवश्यक ती फवारणी केली जाते. पाण्याची गरज कमी असून झाडांमध्ये आंतरपीक घेण्याचीही सुविधा आहे. विशेष म्हणजे खजूर कोणत्याही हवामानात तग धरू शकतो.
चार वर्षांनी मिळणार फळ
खजूर हे पीक दीर्घकालीन आहे. लागवडीनंतर सुमारे चार वर्षांनी उत्पादन सुरू होते, मात्र त्यानंतर अनेक वर्षे नियमित उत्पन्न मिळते. दुबईसारख्या वाळवंटी भागात मोठ्या प्रमाणावर घेतले जाणारे हे पीक नारळाच्या झाडाएवढे उंच वाढते आणि बाजारात त्याला चांगली मागणी आहे.
तरुणांसाठी प्रेरणा
एकाच पिकाकडे सगळ्यांचा कल असतो. पण शेतीतून जास्त आणि कायमस्वरूपी उत्पन्न घ्यायचे असेल तर वेगळा विचार करणे गरजेचे आहे. चार वर्षांनंतर त्यांच्या शेतात खजूर उत्पादन सुरू झाल्यानंतर हा प्रयोग अनेक तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.- अनिकेत डक, शेतकरी
शेतीतून यशाचा नवा संदेश
नोकरीच्या मागे न लागता, उच्चशिक्षणाचा उपयोग आधुनिक शेतीत करून अनिकेत अशोक डक यांनी बीड जिल्ह्यात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांची खजूर लागवडीची ही यशकथा निश्चितच मराठवाड्यातील तरुणांना शेतीकडे नव्या दृष्टीने पाहण्यास प्रवृत्त करणारी आहे.
