Cotton Harvesting : सलग दोन महिन्यांच्या मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले असून, सोयाबीन आणि बागायती कपाशीवर रोगराई व बोंडसडीचा तडाखा बसला आहे. (Cotton Harvesting)
अशा प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांनी हार मानली नाही आणि पारंपरिक 'सीतादही' विधी करून उरलेल्या कपाशीची वेचणी सुरू केली आहे. (Cotton Harvesting)
नवरात्रोत्सवाच्या शुभमुहूर्तावर शेतकरी आपल्या शेतात 'सीतादही' विधी करून धरणीमातेची पूजा करतात आणि यानंतरच कापूस वेचणीस प्रारंभ करतात. हा पारंपरिक कृषी सोहळा उमरा परिसरात आजही उत्साहात पार पडतो.(Cotton Harvesting)
पावसाने घेतली कसोटी
या वर्षी सातत्याने पडलेल्या पावसामुळे कपाशीच्या बोंड्या उमलण्यापूर्वीच सडून गेल्या. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. अनेक ठिकाणी कपाशी काळी पडल्याचेही चित्र दिसत आहे.
पारंपरिक 'सीतादही' विधी
या विधीत शेतात पहाटे दोन झाडांमध्ये पाळणा बांधून त्यात कापसाची झाडे ठेवली जातात. दही-भाताची उधळण करून धरणीमातेची पूजा केली जाते.
यानंतर कापूस वेचणीस सुरुवात होते. हा पारंपरिक सोहळा आजही ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या श्रद्धेचा आणि परिश्रमाचा साक्षीदार आहे.
उत्पादन घटले, पण आत्मविश्वास कायम
सुरुवातीपासून खरीप पिकांवर रोगराईचा प्रकोप होता. त्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकली.
सीतादही करून कपाशी वेचणी सुरू केली आहे. नुकसान मोठं झालं असलं तरी मेहनतीवर विश्वास ठेवून काम सुरू आहे. - अजू पठाण, शेतकरी
सततच्या पावसामुळे सुरुवातीचा शेतमाल सडला. बोंड्या कमी असून उत्पादन खर्चही निघत नाही. तरी जेवढा कापूस शिल्लक आहे, तो तरी वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.- प्रशांत येऊल, शेतकरी
या वर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी कसोटीचा ठरला आहे. पावसाने दिलेला दणका अजूनही ओसरलेला नाही, तरीही उमरा परिसरातील शेतकरी परंपरा आणि जिद्दीच्या जोरावर उरलेला कापूस वाचवण्यासाठी झटत आहेत. 'सीतादही' विधीने त्यांच्या आयुष्यातील नवी आशा पेटवली आहे.