हिंगोली : यंदाच्या खरिपात निसर्गाने शेतकऱ्यांवर सतत आघात केले. ऑगस्ट–सप्टेंबरमधील अतिवृष्टीने सोयाबीन वाहून गेले, उशिरा लावलेला कापूस ऑक्टोबरमध्ये वेचणीला येताच पुन्हा अवकाळी पावसाचा मारा झाला. (Cotton Crop Crisis)
या सलग संकटांनंतर आता जिल्ह्यात तांबेरा या रोगाने थैमान घातले असून एकूण ३७ हजार हेक्टरवरील कापूस पिकाला गंभीर धोका निर्माण झाला आहे.(Cotton Crop Crisis)
अतिवृष्टीत बचावलेलं पीक तांबेऱ्यात अडकले
कापसाच्या पानांवर लालसर ठिपके पडत आहेत
पाने वाळत असून पऱ्हाट्या दिसत आहेत
फुले व बोंडे लागणे थांबले आहे
उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांपर्यंत घट संभवते
नुकसाग्रस्त शेतकरी सांगतात की, सोयाबीन हातचे गेल्यावर किमान कापसातून काहीतरी हाती येईल अशी अपेक्षा होती; मात्र तांबेरा रोगामुळे तेही धोक्यात आले आहे.
जिल्ह्यातील कापसाचे क्षेत्र : ३७ हजार २५९ हेक्टर
हिंगोली जिल्ह्यात प्रमुख पिकांमध्ये सोयाबीनसोबत कापूस आणि हळदीचे महत्त्व आहे. यंदाच्या हंगामात मोठ्या प्रमाणावर कपाशी लागवड करण्यात आली.
तालुकानिहाय लागवड क्षेत्र
वसमत : ९,१०५ हेक्टर
कळमनुरी : ६,९२१ हेक्टर
हिंगोली : ६,४३५ हेक्टर
औंढा नागनाथ : ४,८४९ हेक्टर
सेनगाव : ४,९४९ हेक्टर (एकूण)
सर्वाधिक लागवड वसमत तालुक्यात झाली.
तुरीच्या पिकावरही अळीचा प्रचंड प्रादुर्भाव
कापूसच नव्हे तर सध्या फुलोरा येत असलेल्या शेंगा वाढीच्या अवस्थेतील तुरीवर अळीचा जोरदार प्रादुर्भाव झाला आहे. अळ्या शेंगा परिपक्व होण्यापूर्वीच खाऊन टाकत असल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती आहे.
शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चाने कीटकनाशके फवारली तरीही कीड नियंत्रणात येत नाही, अशी तक्रार आहे. अनेकांनी कृषी विभागाकडे तातडीच्या मार्गदर्शनाची मागणी केली आहे.
आर्थिक गणित कोलमडले
सततच्या नैसर्गिक आघातांमुळे उत्पादन घटले, खर्च वाढला, किमतीची अपेक्षा कमी झाली शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती डळमळीत झाली आहे.
सोयाबीनमधून नुकसान भरून निघेल, असे वाटत असताना कापसावर तांबेरा रोगाचा आणि अळीचा दणका बसल्याने शेतकरी तीव्र संकटात सापडले आहेत.
कृषी विभागाकडून तातडीच्या उपाययोजना आवश्यक
शेतकऱ्यांचा मागणीनुसार
तांबेरा रोगावरील शास्त्रोक्त सल्ला
अळी नियंत्रणासाठी मार्गदर्शन
आवश्यक तेथे अनुदान, मोफत औषधे
नुकसानभरपाईची मागणी
यावर कृषी विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
