Citrus Crop Management : विदर्भात संत्रा, मोसंबी व लिंबू वर्गीय बागांमध्ये सध्या बुरशीजन्य 'तेलकट डाग' (ग्रेसी स्पॉट) या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून, त्यामुळे झाडांची मोठ्या प्रमाणात पानगळ होत आहे. (Citrus Crop Management)
ही पानगळ पुढील बहरावर थेट परिणाम करणारी असल्याने शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असल्याचे कृषी शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. (Citrus Crop Management)
पानगळीसाठी अनेक रोग कारणीभूत असले तरी सध्या बागांमध्ये ग्रेसी स्पॉट हा रोग प्रकर्षाने दिसून येत आहे. अनुकूल वातावरणात या रोगाचा प्रसार झपाट्याने होतो आणि काही दिवसांतच झाडांवरील पाने गळून पडतात. परिणामी झाडांची वाढ खुंटते आणि पुढील फुलोरा व उत्पादनावर लक्षणीय परिणाम होतो.(Citrus Crop Management)
रोगाची लक्षणे कशी ओळखाल?
या रोगामुळे पानांच्या वरच्या व खालच्या बाजूस अनियमित आकाराचे, पिवळसर वलय असलेले तेलकट चट्टे दिसून येतात. पानांवरील पेशींमध्ये बुरशी प्रवेश केल्यामुळे हरितद्रव्य निर्मिती थांबते. त्यामुळे पाने पिवळी पडतात, त्यावर काळसर डाग दिसू लागतात आणि शेवटी पाने गळून पडतात.
फळांवर संसर्ग झाल्यास फळांच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाचे लहान तेलकट डाग तयार होतात. अशी फळे पूर्णपणे एकसारख्या पिवळ्या रंगाची होत नाहीत. काही फळे हिरवी-पिवळीच राहतात, ज्याचा थेट परिणाम दर्जा व उत्पादनावर होतो.
बीजाणू वाढल्याने संक्रमण तीव्र
पीडीकेव्ही, अकोला येथील शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, पानांवर दीर्घकाळ ओलावा टिकून राहणे आणि २५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान हे या रोगाच्या वाढीस अत्यंत पोषक ठरते.
ही परिस्थिती प्रामुख्याने जून ते ऑक्टोबर या कालावधीत आढळते. त्यानंतर डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात थंड हवामान व कमी आर्द्रतेत बुरशीच्या बीजाणूंची संख्या वाढल्याने संक्रमण अधिक तीव्र होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
पुढील बहरावर होणार मोठा परिणाम
सध्या होत असलेली पानगळ ही केवळ झाडांच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर पुढील बहरासाठीही घातक ठरणारी आहे. झाडांवर पुरेशी पाने नसल्यास अन्ननिर्मिती कमी होते, परिणामी फुलधारणा आणि फळधारणा दोन्ही घटतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
असे करावे पानगळीचे एकात्मिक व्यवस्थापन
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील तज्ज्ञ डॉ. योगेश इंगळे, डॉ. दिनेश पैठणकर व डॉ. हितेंद्रसिंह गोरमनगर यांनी शेतकऱ्यांना काही उपाय सुचविले आहेत.
* बागेत खाली पडलेली रोगग्रस्त पाने त्वरित गोळा करून नष्ट करावीत
* गरजेपेक्षा अधिक सिंचन टाळावे
* ऑक्टोबरनंतर रोगाची तीव्रता दिसल्यास
* झायनेब २ ग्रॅम किंवा
* कॉपर ऑक्सिक्लोराइड ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी
यापैकी एका बुरशीनाशकाची फवारणी करावी
* पर्यायाने मिनरल ऑइल २ टक्के फवारणी करावी
* झाडांच्या परिघातील गळालेल्या पाला-पाचोळ्यावरही फवारणी करणे आवश्यक आहे
का पडतात पानांवर तेलकट डाग?
उच्च तापमान व अधिक पर्जन्यमान असलेल्या भागात हा रोग वर्षभर सक्रिय राहू शकतो. बागेत गळालेली पाने योग्यरीत्या नष्ट न केल्यास त्यावर बुरशीचे बीजाणू तयार होतात.
हे बीजाणू हवेद्वारे निरोगी पानांवर जाऊन संक्रमण वाढवतात. बुरशी पानांच्या पेशींमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या पेशी मृत होतात आणि त्यातूनच पानांवर काळसर तेलकट डाग दिसू लागतात. या रोगाचा फटका थेट उत्पादन व उत्पन्नावर बसतो.
शेतकऱ्यांना आवाहन
संत्रा, मोसंबी व लिंबू उत्पादक शेतकऱ्यांनी या रोगाकडे दुर्लक्ष न करता वेळीच एकात्मिक व्यवस्थापन उपाय राबवावेत, जेणेकरून पुढील बहर सुरक्षित राहील आणि उत्पादनात घट होणार नाही, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.