Chickpea Crop Sowing : यंदाच्या रब्बी हंगामात पाटोदा तालुक्यातील शेतकरी पारंपरिक सपाट पेरणीऐवजी पट्टा पद्धतीने हरभरा पेरणी करण्याकडे मोठ्या प्रमाणावर वळताना दिसत आहेत. (Chickpea Crop Sowing)
बदलत्या हवामान परिस्थिती, अनिश्चित पर्जन्यमान, पाणीटंचाई आणि वाढता उत्पादन खर्च या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आधुनिक व शास्त्रीय पद्धतीचा स्वीकार केल्याने उत्पादन वाढ, पाण्याची बचत आणि खर्चात कपात होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. (Chickpea Crop Sowing)
गत काही वर्षांपासून पावसाच्या लहरीपणामुळे आणि सिंचनाच्या मर्यादित सुविधांमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. (Chickpea Crop Sowing)
अशा परिस्थितीत कृषी विभाग, प्रगतिशील शेतकरी तसेच खासगी कृषी सेवा केंद्रांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शेतकऱ्यांनी यंदा हरभऱ्याची पट्टा पद्धतीने पेरणी करण्याचा प्रयोग केला आहे. (Chickpea Crop Sowing)
या पद्धतीत शेतात उंच सऱ्या तयार करून मधोमध सपाट पट्टे ठेवले जातात. त्यावर नियोजनबद्ध अंतरावर बियाणे पेरले जात असल्याने पाणी थेट पिकांच्या मुळांपर्यंत पोहोचते. (Chickpea Crop Sowing)
या पद्धतीत अतिरिक्त पाणी साचत नसल्यामुळे मुळांची वाढ चांगली होत असून रोपांची उगवण एकसारखी होत आहे. पारंपरिक सपाट पेरणीच्या तुलनेत पट्टा पद्धतीत सुमारे ३० टक्के पाण्याची बचत होत असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे कमी पाण्यातही पीक तग धरत असून पिकांची वाढ जोमाने होत आहे.
उत्पादनात १० ते १५ टक्के वाढीची अपेक्षा
शेतकऱ्यांच्या मते, यापूर्वी सपाट पद्धतीने हरभरा घेतला असता रोपांची संख्या, फुलधारणा व शेंगांची वाढ यामध्ये मोठी तफावत दिसून येत होती. मात्र पट्टा पद्धतीत रोपांची संख्या संतुलित राहत असून फुलधारणा चांगली होत आहे. त्यामुळे हरभऱ्याचे उत्पादन किमान १० ते १५ टक्क्यांनी वाढेल, असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत.
तण नियंत्रण सोपे; खर्चात बचत
पट्टा पद्धतीचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे तण नियंत्रण सुलभ झाले आहे. सऱ्यांमधून कोळपणी किंवा यांत्रिक निंदणी करणे सोपे जात असून मजुरीवरील खर्चात लक्षणीय घट झाली आहे. तसेच खत व औषधांचा वापर मर्यादित आणि परिणामकारक होत असल्याने एकूण उत्पादन खर्चातही बचत होत आहे.
पाण्याची बचत, वाढते उत्पादन आणि कमी खर्च यामुळे पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांचा पट्टा पद्धतीकडे वाढता कल दिसून येत आहे. भविष्यात ही पद्धत इतर तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जाईल, असा अंदाज कृषी तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
