Chia Seed Tilgul : मकरसंक्रांतीच्या पारंपरिक तीळ-गूळ खाण्याच्या प्रथेला आधुनिक पोषणमूल्यांची जोड देत वाशिम शेतीशिल्प अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या चिया तिळगूळ, चिया चिक्की आणि चिया न्यूट्री बार या नाविन्यपूर्ण व आरोग्यदायी उत्पादनांचा शुभारंभ नुकताच जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते करण्यात आला.
या उपक्रमामुळे परंपरा आणि आरोग्य यांचा सुंदर संगम साधला गेला असून, ग्रामीण महिलांसाठी स्वयंरोजगाराचे नवे दालन खुले झाले आहे.
या कार्यक्रमाला आत्मा प्रकल्प संचालक अनीसा महाबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, कृषी उपसंचालक हिना शेख, उद्योग सहसंचालक (अमरावती) नीलेश निकम, जिल्हा उद्योग केंद्र वाशिमच्या महाव्यवस्थापक पूनम घुले तसेच सीएम फेलो संकेत नरुटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मकरसंक्रांतीच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीला आधुनिक आरोग्यदृष्टीने अधिक समृद्ध करण्यासाठी या उत्पादनांमध्ये चिया बियाण्यांचा समावेश करण्यात आला आहे.
चिया बिया या ओमेगा-३ फॅटी अॅसिड, फायबर आणि प्रथिनांनी समृद्ध असल्यामुळे चिया तिळगूळ, चिक्की आणि न्यूट्री बार हे पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरत आहेत.
या उत्पादनांच्या निर्मितीसाठी आत्मा अंतर्गत बंगळुरू येथे चिया न्यूट्री बार निर्मितीचे विशेष प्रशिक्षण घेण्यात आले होते. त्या प्रशिक्षणाच्या आधारे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी व महिला बचत गटांनी प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रिया सुरू केली, ज्यामुळे ग्रामीण महिलांना स्थानिक पातळीवर रोजगार व उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे.
या उपक्रमाला पुढील चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे १३ व १४ जानेवारी २०२६ रोजी 'चिया तिळगूळ महोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात चिया आधारित विविध पदार्थांची माहिती, प्रत्यक्ष चाखण्याची संधी तसेच विक्रीची व्यवस्था करण्यात येणार असून, ग्राहक आणि स्थानिक उत्पादक यांना थेट संवाद साधता येणार आहे.
आरोग्यदायी आहाराची जाणीव वाढत असताना अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळून शेतकरी व महिला बचत गट आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी या चिया तिळगूळ महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
हे ही वाचा सविस्तर : Til Crop : बदलत्या हवामानाचा फटका; तिळ पिकावर 'संक्रांत' वाचा सविस्तर
