गजानन गंगावणे
वारंवारच्या पावसाने खरीपातील सोयाबीनचे नुकसान झाले, पण वाशिमच्या शेतकऱ्याने हार मानली नाही. देपूळ येथील रत्नाकर गंगावणे यांनी चियाच्या लागवडीचा अभिनव प्रयोग केला आणि तो यशस्वी ठरला. आता चिया पीक शेतकऱ्यांसाठी नवा आर्थिक पर्याय ठरत आहे.(Chia Farming)
या वर्षीच्या खरीप हंगामात सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुबार आणि तिबार पेरणी करूनही अनेक ठिकाणी सोयाबीन पीक उगवले नाही. (Chia Farming)
अशा प्रतिकूल परिस्थितीत देपूळ येथील प्रगतशील शेतकरी रत्नाकर नारायण गंगावणे यांनी पारंपरिक पिकांऐवजी चिया (Chia) या नवनवीन पिकाची लागवड करून दाखवली आहे. हा अभिनव प्रयोग आता शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे.(Chia Farming)
खरीपात चिया पिकाचा प्रयोग यशस्वी
सहायक कृषी अधिकारी धम्मपाल पाईकराव यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नाकर गंगावणे यांनी पाच एकर क्षेत्रावर चियाची लागवड केली. साधारणपणे रब्बी हंगामात घेतले जाणारे हे पीक त्यांनी खरीपात घेतले असून, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, एकात्मिक कीड नियंत्रण आणि योग्य खत व पाणी व्यवस्थापनामुळे पीक सध्या परिपक्व अवस्थेत आले आहे.
एकरी तीन ते पाच क्विंटल उत्पादनाची अपेक्षा
सध्या चिया पिकाची वाढ समाधानकारक असून, एकरी तीन ते पाच क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. पाच एकर क्षेत्रावर एकूण २० ते २५ क्विंटल उत्पादन मिळण्याची शक्यता आहे.
बाजारात सध्या चियाच्या बियांना २० ते २२ हजार रुपये प्रति क्विंटल असा आकर्षक दर मिळत आहे. त्यामुळे हे पीक शेतकऱ्यांसाठी सोयाबीनला पर्याय आणि आर्थिक दृष्ट्या फायदेशीर पर्याय ठरू शकते.
चियाचे पोषणमूल्य आणि बाजारपेठ
चिया बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड, फायबर, प्रोटीन आणि खनिजांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आरोग्यजागरूक ग्राहकांमध्ये या बियांची मोठी मागणी आहे. देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही चियाला उच्च दर मिळतो.
खरीप हंगामातील अनिश्चित हवामानामुळे शेतकरी पारंपरिक पिकांपासून दूर जात आहेत. अशा वेळी देपूळ येथील या चिया प्रयोगाने नवा मार्ग दाखवला आहे. योग्य बाजारपेठ आणि शासकीय प्रोत्साहन मिळाल्यास चिया पिकाचे उत्पादन वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढू शकते.
शक्यतोवर रब्बी हंगामात घेतले जाणारे चिया पीक हे कृषी तंत्रज्ञान, एकात्मिक कीड नियंत्रण, तसेच योग्य खत आणि पाणी व्यवस्थापनाच्या जोरावर रत्नाकर गंगावणे यांनी खरिपात घेतले आहे. सध्या चिया पीक चांगल्या अवस्थेत असून, हे पीक सोयाबीनला पर्याय ठरू शकते.- धम्मपाल पाईकराव, सहायक कृषी अधिकारी (वारा, देपूळ)
खरीप हंगामात सोयाबीन अपयशी ठरले, पण चिया पिकाने चांगला आधार दिला आहे. - रत्नाकर नारायण गंगावणे, शेतकरी
हे ही वाचा सविस्तर : MahaDBT Scheme : शेतीत वाढणार कार्यक्षमता; हजारो शेतकरी सज्ज आधुनिक यंत्रांसह!
