संतोष शेंडे
टाकरखेडा संभू (ता. भातकुली) येथे कृषी विभाग आणि कृषी व्यवस्थापन यंत्रणेच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली चिया बियाणे लागवडीचा पहिलाच प्रयोग सुरू करण्यात आला आहे. (Chia Cultivation)
भातकुली तालुक्यातील खारपणपट्ट्यात रब्बी हंगामासाठी पर्यायी पिकांचा शोध घेण्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रयोग शेतकऱ्यांच्या दृष्टीने आशादायी मानला जात आहे. (Chia Cultivation)
प्रायोगिक लागवड सुरू
जिजामाता कृषी भूषण पुरस्कारप्राप्त पौर्णिमा सवाई यांनी आपल्या शेतात चियाची पेरणी करून या उपक्रमाची पहिली सुरुवात केली. प्रात्यक्षिकासाठी शेतकऱ्यांना चिया बियाणे पुरविण्यात आले असून गावातील अनेक शेतकरी या अभिनव उपक्रमात उत्साहाने सहभागी झाले आहेत.
कृषी तज्ज्ञांच्या मते,
कमी पाणी
कमी उत्पादन खर्च
मर्यादित फवारणी
आणि बाजारातील चांगली मागणी
यामुळे चिया हे पीक हरभऱ्याला उत्तम पर्याय ठरू शकते.
पौष्टिकतेचा खजिना!
चिया बियाणे जगभर सुपरफूड म्हणून ओळखले जाते. या पिकामध्ये प्रथिने, फायबर, ओमेगा-३ फॅटी अॅसिड, कॅल्शियम, अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात.
घरगुती आहारापासून ते उपवासाच्या पदार्थांपर्यंत आणि हेल्थ ड्रिंक्समध्ये चियाचा व्यापक वापर वाढत आहे. वजन नियंत्रणासाठी 'चिया वॉटर' आज मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे.
चिया पिकाची वैशिष्ट्ये
* कमी पाणी लागते
* फवारणीचा खर्च जवळपास नाही
* उत्पादन खर्च अत्यल्प
* बाजारात सातत्याने वाढती मागणी
* पौष्टिक व निर्यातक्षम उत्पादन
यामुळे चिया लागवड शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन लाभदायी ठरू शकते, असे कृषी अधिकाऱ्यांचे मत आहे.
कृषी विभागाची भूमिका
भातकुली तालुका खारपाणपट्टा असल्याने पारंपरिक हरभरा पिकासमोर अनेक अडचणी उभ्या राहतात. म्हणूनच चिया हे पर्यायी पीक म्हणून काही गावांत प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे.
हरभऱ्याच्या तुलनेत चिया पिकाचा खर्च एकरी अत्यंत कमी आहे. नियोजन व तांत्रिक मार्गदर्शन मिळाल्यास हे पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल.- रूपाली ठाकरे, सहायक कृषी अधिकारी
शेतकऱ्यांसाठी नवी दिशा
टाकरखेडा संभू येथे सुरू झालेला हा पहिला प्रयोग यशस्वी झाल्यास रबी हंगामात चिया हे नवे पर्याय पीक म्हणून गावोगाव पसरू शकते. बदलत्या वातावरणात आणि वाढत्या इनपुट खर्चात चिया लागवड शेतकऱ्यांसाठी नफा देणारा मार्ग ठरू शकतो, अशी अपेक्षा तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
