धाराशिव : परंडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गाळप हंगाम २०२५-२६ ची पहिली उचल प्रति मे. टन २ हजार ८०० रुपये देण्याची घोषणा केली आहे. कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
या युनिटमध्ये गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये शुक्रवारपर्यंत १ लाख ५१ हजार ४४५ मे. टन उसाचे गाळप झाले आहे. चेअरमन अनिल सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकात, "शेतकऱ्यांचा ऊस गाळपाअभावी शिल्लक राहणार नाही", अशी ग्वाहीदेखील दिली आहे.
भैरवनाथ शुगरने नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफ.आर.पी. पेक्षा जास्त दर दिला आहे असेही पत्रकात म्हटले आहे. तसेच भैरवनाथ शुगर सोनारी युनिटचे गाळप हंगाम २०२५-२६ मधील गाळप आजअखेर १५१४४५ मेट्रिक टन झाले आहे. कारखाना प्रशासन मंडळाच्या नियोजनाने गाळप प्रक्रिया जोमात सुरू आहे.
चेअरमन अनिल सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले की, 'शेतकऱ्यांचा ऊस गाळपाअभावी शिल्लक राहणार नाही, यासाठी कारखान्याचे व्यवस्थापन कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा परिपक्व ऊस कारखान्यास गाळपासाठी पाठवून सहकार्य करावे, असे आवाहनही चेअरमन अनिल सावंत यांनी केले आहे.
