Pith Girni Business : शेती, शेतमजुरी हे हंगामी काम. शेतीला पुरक व्यवसायाची जोड असावी, या उद्देशाने भगवानपूर येथील महिला अनिता अनिल येलमुले यांनी कर्ज घेऊन आटाचक्की दळण व्यवसाय सुरू केला. आता त्यांना महिन्याला ८ हजार ते १० हजार रुपयांचा आर्थिक नफा मिळत आहे. त्यांना या व्यवसायामुळे दिलासा मिळाला आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिलांना ३ टक्के निधीतून व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. गडचिरोली तालुक्यातील भगवानपूर येथील मातोश्री बचत गटाच्या सदस्य अनिता अनिल येलमुले यांना आटा चक्कीच्या व्यवसायासाठी ३ टक्के राखीव निधीमधून 'महिला उद्योजिका' अंतर्गत १ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले.
त्या आता महिन्याला ८ हजार ते १० हजार रुपयांचा आर्थिक नफा मिळवत आहेत. अनिता येलमुले या गृहिणी आहेत. त्यांना रोजगार करण्याची इच्छा होती. त्यांना त्यांच्या गावातील आटाचक्कीची कमतरता लक्षात घेऊन आटाचक्कीचा व्यवसाय करण्याची संकल्पना सूचविली. येलमुले यांनी इतर महिलांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
शेतमजूर महिलेने घरीच सुरू केली पीठगिरणी
अनिता येलमुले यांनी कर्ज मंजुरी प्रस्ताव तयार करून जिल्हा उद्योग केंद्राला पाठविला. प्रस्ताव पास झाला. पण, बँकेने तो नाकारल्यामुळे व्यवसाय सुरू झाला नाही. त्यानंतर ३ टक्के राखीव निधीमधून महिला उद्योजिका याअंतर्गत १ लाख ५० हजार रुपये त्यांना २ वर्षांच्या मुदतीसाठी कर्जाच्या माध्यमातून देण्यात आले. यातून त्यांनी आटा चक्की व्यवसाय सुरु केला आहे.
किराणा दुकानही केले सुरू
गावातील व गावाशेजारील महिलांचे दळण त्यांच्या आटाचक्कीमध्ये येऊ लागले. याच व्यवसायाला जोडधंदा म्हणून किराणा दुकान व्यवसाय सुरू केला. त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहून पतीच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा हाकत आहेत.