Banana Tissue Culture : नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादकांना दर्जेदार, रोगमुक्त आणि निर्यातीयोग्य उत्पादन मिळावे यासाठी ५० एकर जागेत 'टिश्यू कल्चर' प्रकल्प उभारण्यात येणार आहे. (Banana Tissue Culture)
केंद्र शासनाच्या पथकाने मुदखेड तालुक्यातील खुजडा येथील जागेची पाहणी केली असून, हा प्रकल्प नांदेडसाठी आंतरराष्ट्रीय बाजाराची दारे उघडणारा ठरणार आहे.(Banana Tissue Culture)
नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादकांच्या शेतीला 'टिश्यू कल्चर' तंत्रज्ञानाची जोड मिळणार असून त्यामुळे केळीचे उत्पादन अधिक दर्जेदार, रोगमुक्त आणि निर्यातीयोग्य होणार आहे. (Banana Tissue Culture)
केंद्र शासनाद्वारे भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड, नवी दिल्ली संस्थेच्या सहकार्याने ५० एकर क्षेत्रात 'टिश्यू कल्चर' तंत्रज्ञानाची उभारणी करण्यासाठी शुक्रवारी केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील खुजडा येथील ५० एकर शासकीय गायरान जमिनीवर प्रस्तावित जागेची पाहणी केली.
'केळी' उत्पादनाचा उत्तम दर्जा व भरघोस उत्पादनातून शेतकऱ्यांना फायदा व्हावा, यासाठी 'टिश्यू कल्चर' स्थापनेसह बीज उत्पादन, संरक्षण व संवर्धन सुविधा उपलब्ध होणार आहेत.
या प्रकल्पासाठी केंद्रीय पथकाने ४ जुलै रोजी नांदेड जिल्ह्याचा दौरा केला. येथील शासकीय विश्रामगृहात डॉ. जयप्रकाश तम्मीनन यांचे समक्ष जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी सादरीकरणाद्वारे नांदेड व परिसरातील आठ जिल्ह्यात केळीचे क्षेत्र, विस्तार, उत्पादन, उत्पादकता आणि निर्यात वाढीच्या संधी, टिशू कल्चर रोपांची सद्यस्थितीत उपलब्धता आणि आवश्यकता, सदर प्रकल्पाची नांदेड जिल्ह्यासाठीची उपयुक्तता, जिल्ह्यातील रोड, रेल्वे, हवाई कनेक्टिव्हिटी, सिंचन, संशोधन केंद्र आदी पायाभूत सुविधांच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित प्रकल्पाची तांत्रिक अनुकूलता आणि आर्थिक व्यवहार्यता विशद केली.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर, मुदखेडचे तहसीलदार देऊळगावकर, केळी संशोधन केंद्राचे अधिकारी शिंदे, निलेश देशमुख, तंत्र अधिकारी स्वामी, कृषी अधिकारी चामे हे उपस्थित होते. त्यानंतर डॉ. जयप्रकाश तम्मीनन यांनी अधिकाऱ्यांसमवेत खुजडा येथील प्रस्तावित जागेची भेट देऊन पाहणी केली.
सदर प्रकल्पाची अंतिम जागा निवड लवकरच निश्चित होणार आहे. नांदेडसह जालना व जळगाव जिल्ह्यांचा देखील यासाठी विचार करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे नांदेडच्या केळीचा दर्जा उंचावेल आणि थेट आंतरराष्ट्रीय बाजाराची दारे खुली होतील.
जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वतयारी
या टिशू कल्चर प्रकल्पासाठी नांदेड, जालना आणि जळगाव जिल्ह्यांतील प्रस्तावित जागांपैकी एकाच जागेची निवड होणार असल्याने सदर प्रकल्पासाठी नांदेड जिल्ह्याची निवड व्हावी, यासाठी मागील काही दिवसांपासून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विशेष लक्ष देऊन कृषी विभाग, महसूल विभाग व केळी संशोधन केंद्राच्या समन्वयातून विशेष पूर्वतयारी केली.
प्रस्तावित जागेची पाहणी
नवी दिल्लीतील भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेडचे वितरण साखळीचे प्रमुख डॉ. जयप्रकाश तम्मीनन यांनी प्रस्तावित शासकीय जागेची पाहणी केली. त्यांच्यासोबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, केळी संशोधन केंद्राचे अधिकारी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.