जळगाव :केळीच्या फुलांमधील 'ॲन्थोसियानीन' हा घटक वेगळा करण्याच्या प्रक्रियेला केंद्र शासनाच्या बौद्धिक संपदा विभागाचे पेटंट मिळाले आहे. डॉ. तेजोमयी भालेराव यांच्या या संशोधनातून 'ॲन्थोसियानीन' हा घटक कर्करोग नियंत्रणासह उपचारादरम्यान अतिशय प्रभावी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संशोधनामुळे केळीचे फूल आता थेट कर्करोगालाच कुस्करायला निघणार आहे.
'ॲन्थोसियानीन' हा पूर्णतः नैसर्गिक घटक असून, त्यातील ऑक्सिडीकरणविरोधी व दाहकविरोधी गुणधर्मामुळे मानवी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तसेच, नैसर्गिक रंगद्रव्याचा उपयोग कर्करोगविरोधी उपचारांमध्ये गुणकारी असल्याचा निष्कर्ष डॉ. भालेराव यांनी नोंदविला आहे.
विलगीकरणानंतर या घटकाची गुणवत्ता जास्तीत जास्त २१ दिवसांपर्यंत टिकून राहते. भालेराव यांनी त्यावर संशोधन सुरू केले आणि गुणवत्ता टिकून राहण्याच्या कालावधीत ६ ते ९ महिन्यांच्या करण्यात त्यांना यश मिळाले आहे.
संशोधनातील निष्कर्ष
'ॲन्थोसियानीन' या घटकाचा वापर केल्यास ७२ ते ८० कर्करोगग्रस्त पेशी २४ तासांच्या कालावधीत मृत पावतात. निरोगी पेशींवर कुठलाही विपरीत परिणाम होत नाही. हा घटक नैसर्गिक असल्याने त्याचा शरीरावर कुठलाही परिणाम होत नाही.
केळीच्या झाडातील विविध घटक औषधी म्हणून उपयुक्त आहेत. मात्र, दुर्दैवाने त्याचा वापर होत नाही. त्यामुळेच मी या संशोधनाकडे वळले.
- डॉ. तेजोमयी भालेराव, संशोधक
