Banana Export : हवामानातील बदल आणि थंडीचा परिणाम होत असतानाही अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील तामसी येथील शेतकऱ्यांनी मोठी कामगिरी केली आहे. (Banana Export)
अवघ्या १५ एकर क्षेत्रात उत्पादित केलेली १५० टन उच्च दर्जाची केळी थेट व्हिएतनामला निर्यात करण्यात आली आहे.(Banana Export)
हवामानातील सततचे बदल, कमी तापमान आणि थंडीचा केळी उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत असतानाही अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील मौजे तामसी येथील शेतकऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश केला आहे.(Banana Export)
तामसी येथील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली तब्बल १५० टन उच्च दर्जाची केळी व्हिएतनाम देशात निर्यात करण्यात आली असून, या यशामुळे तामसीसह संपूर्ण बाळापूर तालुक्याचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे.(Banana Export)
सध्या भारतातून केळीची निर्यात सातत्याने वाढत असून २०२५ मध्ये केळी हे भारताचे सर्वाधिक निर्यात होणारे फळ ठरले आहे.
इराक, ओमान, इराण, संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांसारख्या देशांमध्ये भारतीय केळीला मोठी मागणी आहे.
या पार्श्वभूमीवर तामसी गावातील युवा शेतकरी मिथुन काळे, अमोल काळे आणि गजानन ढोरे यांनी अवघ्या १५ एकर क्षेत्रात केळीची लागवड करून पहिल्याच कटणीत थेट १५० टन उत्पादन घेत निर्यातीपर्यंत मजल मारली आहे.
ही केळी साई राम एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट कंपनीच्या माध्यमातून कंटेनरद्वारे व्हिएतनामला पाठविण्यात आली.
स्थानिक शेतकऱ्यांनी केलेली ही निर्यात परिसरासाठी अभिमानास्पद ठरत असून, यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे दरवाजे खुले होऊ शकतात, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
निर्यातीची ठळक वैशिष्ट्ये
गाव : तामसी, ता. बाळापूर, जि. अकोला
लागवड क्षेत्र : १५ एकर
निर्यात प्रमाण : १५० टन केळी
निर्यात देश : व्हिएतनाम
निर्यात माध्यम : साई राम एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट
मार्गदर्शन : आत्मा प्रकल्प - कृषी विभाग
तांत्रिक सहकार्य : कृषी विज्ञान केंद्र, अकोला; डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ
तंत्रज्ञान : ठिबक सिंचन, जैविक शेती, फ्रूट केअर व्यवस्थापन
शेतीशाळेचे मोलाचे योगदान
या यशामागे कृषी विभागाच्या आत्मा यंत्रणेमार्फत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना - पाणलोट २.० अंतर्गत आयोजित शेतीशाळेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
या शेतीशाळेमध्ये कृषी विज्ञान केंद्र, अकोला तसेच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी सखोल मार्गदर्शन केले.
यामध्ये योग्य लागवड तंत्र, ८ बाय ५ फूट अंतरावर लागवड, ठिबक सिंचनाद्वारे अचूक पाणी व्यवस्थापन, जैविक संसाधनांचा वापर, कीड व रोगांचे सुरुवातीपासूनच व्यवस्थापन, अन्नद्रव्यांचे संतुलन तसेच फ्रूट केअर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांचा समावेश होता.
या सर्व तांत्रिक बाबींचा काटेकोर अवलंब केल्यामुळे शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे आणि निर्यातक्षम केळी उत्पादन घेणे शक्य झाले.
इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी यश
तामसी येथील या यशामुळे परिसरातील इतर केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्येही मोठा उत्साह निर्माण झाला आहे.
योग्य मार्गदर्शन, आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांची मेहनत यांची सांगड घातल्यास ग्रामीण भागातूनही आंतरराष्ट्रीय बाजारपेठ गाठता येते, हे या यशातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
