Join us

Bail Pola : शेतकऱ्याने बैलपोळ्याच्या दिवशी बैलाच्या पाठीवर 'नाफेड गो बॅक' असं का लिहलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 21:06 IST

Bail Pola : अनेक शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा राज्याच्या अंगावर 'एकच पक्ष कांद्यावर लक्ष, कांद्याला ३ हजार रुपये भाव द्या, अशा आशयाचे वाक्य लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

Bail Pola :  अनेक दिवसांपासून कांद्याला समाधानकारक भाव (Kanda Market) मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातच आज शेतकऱ्यांचा सर्जा राजाचा सण बैलपोळा साजरा होतोय. या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा राज्याच्या अंगावर 'एकच पक्ष कांद्यावर लक्ष, कांद्याला ३ हजार रुपये भाव द्या, अशा आशयाचे वाक्य लिहीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

तर यातीलच मालेगाव तालुक्यातील ढवळेश्वर येथील शेतकरी तात्यासाहेब बाबुराव पवार यांनी “नाफेड गो बॅक” असे घोषवाक्य बैलांच्या पाठीवर लिहून शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर थेट सरकारला आणि नाफेडला जाब विचारला आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून नाफेड (NAFED) या केंद्रीय संस्थेमार्फत कांद्याचा बफर स्टॉक खरेदी केला जातो. परंतु या खरेदी प्रक्रियेत प्रचंड आर्थिक गैरव्यवहार होत असून, शेतकऱ्यांना न्याय्य दर मिळत नाही. त्यामुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. एकीकडे सरकारकडून "शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ करू" अशी घोषणा केली जाते, तर दुसरीकडे नाफेडसारख्या संस्थेमार्फत शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान घडवले जाते, ही मोठी शोकांतिका आहे.

या पार्श्वभूमीवर तात्यासाहेब पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी बैलपोळ्याच्या दिवशी अनोखा मार्ग अवलंबला. आपल्या बैलजोडीच्या अंगावर "नाफेड गो बॅक" हा घोष लिहून त्यांनी या संस्थेविरोधात जोरदार निषेध नोंदविला आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या :1. नाफेडमार्फत होणारी कांदा खरेदी पारदर्शक पद्धतीने व्हावी.2. शेतकऱ्यांना योग्य दर हमखास मिळेल अशी यंत्रणा उभी करावी.3. बफर स्टॉक प्रक्रियेत होणारे गैरव्यवहार थांबवून दोषींवर कठोर कारवाई करावी.4. शेतकऱ्यांच्या पिकाला बाजारात योग्य भाव मिळेल यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने ठोस धोरण आणावे.

बैलपोळ्याच्या दिवशी नुसते बैल सजवून सण साजरा करण्याऐवजी, शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठीचा लढा पुढे नेण्याचा संदेश या उपक्रमातून दिला गेला आहे. हा अनोखा निषेध सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत असून, अनेक शेतकऱ्यांनी या पद्धतीनेच शेतकरी प्रश्न मांडण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.

“शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडण्यासाठी बैलपोळ्यासारख्या सणावर अशा पद्धतीने निषेध करावा लागतो, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. नाफेडच्या भ्रष्ट आणि अपारदर्शक खरेदीमुळे कांदा शेतकऱ्यांचे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. हा लढा फक्त एका शेतकऱ्याचा नसून संपूर्ण कांदा उत्पादक शेतकरी समाजाचा आहे. सरकारने यापुढील काळात  शेतकऱ्यांना न्याय्य दर आणि पारदर्शक खरेदी प्रक्रिया लागू करावी किंवा मग ही नाफेडची कांदा खरेदीच कायमस्वरूपी बंद करून टाकावी. - भारत दिघोळे, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना 

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतीमार्केट यार्डनाशिक