बालाजी बिराजदार
ग्रामीण भागातील अंगण, शेताच्या बांधावर, रस्त्याच्या कडेला सहज दिसणारी बहुगुणी बाभूळ आज हळूहळू नजरेआड होत चालली आहे. कडाक्याच्या उन्हात घनदाट सावली देणारी, जनावरांसाठी पौष्टिक चारा पुरवणारी आणि शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग ठरलेली बाभळीची झाडे आज बेसुमार वृक्षतोडीच्या कचाट्यात सापडली आहेत. (Babool Tree Benefits)
बाभळीची बहुगुणी उपयुक्तता
बाभळीचे झाड 'संपूर्ण झाड उपयुक्त' म्हणून ग्रामीण जीवनात प्रसिद्ध आहे.
बिया – पौष्टिक, पचनास मदत करणाऱ्या.
साल – तोंडाचे विकार, दातदुखीवर औषधासारखी उपयुक्त.
पाने – जनावरांसाठी पौष्टिक चारा; विशेषतः शेळ्या-मेंढ्यांसाठी.
फुले – मधमाशांना आकर्षित करून मधनिर्मितीस मदत करणारी.
डिंक – आयुर्वेदिक औषधांसाठी उपयुक्त.
काटेरी फांद्या – शेताच्या कुंपणासाठी.
लाकूड – इंधनासाठी वापरले जाते.
झपाट्याने घटणारी संख्या
पूर्वी गावोगाव हिरवळ निर्माण करणारी बाभूळ आज मात्र, बेसुमार तोडीमुळे दुर्मीळ होत आहे. रस्ते, वसाहती, शहरीकरण आणि मोकळ्या जागेची घट यामुळे बाभळीचा मोठ्या प्रमाणावर लोप होत आहे.
वृक्षारोपण मोहिमेत दुर्लक्ष
आजकालच्या वृक्षारोपण मोहिमेत स्थानिक झाडांकडे दुर्लक्ष होऊन शोभेच्या व परदेशी प्रजातींना जास्त महत्त्व दिले जाते. त्यामुळे बाभळीच्या नैसर्गिक व बहुगुणी उपयोगांपासून ग्रामीण समाज दुरावतो आहे.
ग्रामीण अर्थकारणाशी नाळ
बाभळीची झाडे ग्रामीण अर्थव्यवस्थेत थेट योगदान देतात.
चारा, इंधन आणि औषधोपचारासाठी ती अनिवार्य.
शेताच्या बांधावरून मिळणाऱ्या फांद्यांमुळे शेतकऱ्यांना कुंपणाची सोय होते.
उन्हाळ्यात घनदाट सावलीत शेतकऱ्यांना व जनावरांना दिलासा मिळतो.
बाभळीला फक्त काटे आहेत, असा गैरसमज समाजात पसरवला गेला. प्रत्यक्षात हे सर्वाधिक उपयुक्त झाड आहे. आज ती झाडे वाचवली नाहीत, तर पुढील पिढ्या या नैसर्गिक संपत्तीपासून वंचित राहतील. - गणेश हिप्परगेकर, वृक्षप्रेमी, लोहारा
बहुगुणी बाभळीचा लोप हा केवळ एका झाडाचा नाही तर ग्रामीण जीवनपद्धती आणि पर्यावरणीय संतुलनाचा मोठा प्रश्न आहे. जर वृक्षतोडीवर आळा घातला नाही आणि वृक्षारोपण मोहिमेत स्थानिक, उपयुक्त प्रजातींना प्राधान्य दिले नाही, तर पुढील पिढ्यांना बाभळीच्या सावलीचे महत्त्व फक्त पुस्तकांतूनच कळेल.
हे ही वाचा सविस्तर : Ambadi Bhaji Benefits : पावसाळ्यात का खाल्ली जाते अंबाडीची भाजी? वाचा सविस्तर