Avkali Paus : अनेकदा अवकाळी पावसात (Unseasonal Rain), वादळवाऱ्यात शहरांसह गावखेड्यांमध्ये बांधावरील किंवा रस्त्याच्या कडेची झाडे उन्मळून पडतात. अशा घटनांमध्ये वित्तहानीसह अनेकांचे जीवही गेल्याचे ऐकायला मिळते. या ठिकाणावरील झाडे का कोसळतात? हे आपण या लेखातून जाणून घेऊयात.
अनेकदा वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस (Avkali Paus) कोसळतो. अशावेळी झाडे कोसळण्याचे प्रमाण वाढते. मोकळ्या जागेत असलेली वृक्ष ही फार अल्प प्रमाणात म्हणजेच फार जुना वृक्ष असल्यास तो कोसळलेला दिसतो, बाकी मोकळ्या जागेतील झाडे दिमाखात उभी असतात. कारण त्यांच्या मुळांच्या विस्ताराला कुठल्याही प्रकारची इजा झालेली नसते. त्याच प्रमाणे त्यांच्या पर्णसंभराला मानवी हस्तक्षेप होऊन कुठल्या प्रकारची असंतुलित तोड झालेली नसते. त्यामुळे ते वादळवाऱ्यामध्ये (Stormy Winds) आपला भार सांभाळण्यास सक्षम असतात.
आता रस्त्याच्या कडेची वृक्ष का उळमळुन पडतात? बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेने असलेल्या वृक्षांच्या दोन्ही बाजूने विविध प्रकारच्या खोदकामामुळे जसे पाईपलाईन असो, पावसाळी गटार योजना असो, गॅस लाईन असो इत्यादी कारणांमुळे त्यांच्या मुळांचा विस्तारची तोड झालेली दिसुन येते, त्यांना चांगल्यापैकी नुकसान झालेले असते. तसेच त्यांचा जो पर्णसंभार असतो, त्याची कुठल्या ना कुठल्या कारणाने असंतुलित छाटणी केली जाते. त्यामुळे बराच वेळा एकाच बाजूला त्यांच्या पर्णसंभराचा भार वाढलेला असतो.
बऱ्याच ठिकाणी न्यायालयाचे आदेश डावलून वृक्षांच्या खोडाभोवती गच्च काँक्रिटीकरणाचा थर दिलेला असतो. ज्यामुळे ते आवळले जाऊन खोडाची साल खराब होते किंवा त्याच्या खोडाशी पाणी मुरुन ते कुजतात, अशा वेळेस वादळ वाऱ्यामुळे हे वृक्ष अशा कारणांमुळे आपला भार सांभाळण्यास असक्षम झालेले असतात. म्हणूनच ते आपल्याला उळमळुन पडलेले बघायला मिळतात किंवा त्यांच्या मोठमोठ्या फांद्या तुटून रस्त्यावर पडतात. त्यामध्ये प्रामुख्याने गुलमोहर, रेनट्री, सुबाभूळ, स्पेतोडीया, पेंलट्राफॉर्म इत्यादी परदेशी प्रजातीची भरभर वाढणारी अवाढव्य विस्तार असलेली वृक्ष प्रजातीचा समावेश असतो.
असा टाळता येईल धोका दरम्यान कोसळलेल्या वृक्षांमध्ये या झाडांचे ९५ टक्के प्रमाण असते. कारण याच प्रजाती जास्त करून रस्त्याच्या कडेने लावल्या गेल्या आहेत. शहरातील रस्त्यावरील दुभाजकामध्ये पिंपळ, कडुनिंब, रेनट्री असे वृक्ष लावल्याचे दिसून येते. शिवाय बॉटल पाम, फॉक्सटेल पाम इत्यादी प्रजाती देखील दुभाजकामध्ये लावलेल्या दिसून येतात. पुढील काळात या झाडांपासून देखील धोका संभवतो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अभ्यास पुर्ण योग्य ठिकाणी योग्य वृक्ष प्रजातींची लागवड ही काळाची गरज या उक्तीने जर आपण वृक्षारोपण केलं तर अशी होणारी प्राणहानी व वित्तहानी आपण नक्कीच टाळू शकतो.
- शेखर गायकवाड,आपलं पर्यावरण संस्था, नाशिक