Pune : जगभरातल्या ५० पेक्षा जास्त देशातल्या बियाणे उद्योगातल्या प्रतिनिधींचा सहभाग असलेली आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'एशियन सीड काँग्रेस २०२५' ची सांगता झाली. एशिया पॅसिफिक सीड अलाईन्स, नॅशनल सीड असोशिएशन ऑफ इंडिया आणि फेडरेशन ऑफ सीड इंडस्ट्री ऑफ इंडिया या तीन संस्थांनी मिळून आयोजन केलेल्या कार्यक्रमात १२०० पेक्षा जास्त बियाणे कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. तर बियाण्यांशी संबंधित ३५०० पेक्षा जास्त बैठका झाल्याची माहिती समोर येत आहे.
जागतिक स्तरावर उत्पादनक्षम बियाण्यांच्या उत्पादनसाठी प्रत, बियाण्यासाठीचे तंत्रज्ञान, करार, आंतरराष्ट्रीय खरेदी-विक्री या गोष्टी प्रामुख्याने पार पडल्या. यासोबतच भारताने आपली बियाणे निर्यात ८०० कोटी रुपयांवरून येत्या पाच वर्षात ५००० कोटीपेक्षा जास्त नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
भारताला बियाणे उद्योगाचे जागतिक हब बनण्यासाठी अतिशय उपयुक्त स्थिती आहे. त्याचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे. ते साध्य करण्यासाठी या सीड काँग्रेसचा खूप मोठा फायदा होईल अशी प्रतिक्रिया बियाणे उद्योग क्षेत्रातल्या नामवंत उद्योजकांनी दिली.
दरम्यान, २०१५ मध्ये गोवा इथे एशियन सीड काँग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. पण त्यानंतर तब्बल १० वर्षांनी मुंबईत एशियन सीड काँग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. या सीड काँग्रेसमध्ये आशिया, आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोपा खंडातल्या ५० पेक्षा जास्त देशातून प्रतिनिधी आले होते.
त्यांच्यात बियाण्याची, बियाण्यांच्या तंत्राची मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण झाली. या परिषदेत २ दिवस चाललेल्या चर्चासत्रामध्ये भारतासह अनेक देशातल्या मान्यवरांनी बियाणे उद्योगाच्या वाढीसाठी आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या आणि त्या देशातल्या विकासासाठी काही मार्गदर्शक बाबींवर भर दिला.
"भारतीय बियाणे उद्योगात गुंतवणुकीसाठी आणि भारताला बियाणे उत्पादनवाढीत मला मोठ्या संधी दिसत आहेत. भारतात येत्या काळात बौद्धिक संपदा कायद्यात सुधारणा होतेय त्याचा या क्षेत्रात गुंतवणूक वाढीसाठी फायदा होईल. याचा भारताला बियाणे उद्योगाचे जागतिक हब होण्यास फायदा होईल, तसेच भारताची अन्नसुरक्षा आणि मजबूत होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे."
- टेक वा कोह (अध्यक्ष, एशिया पॅसिफिक सीड अलाईन्स (APSA))
भारत सरकारने बियाणे निर्यातीचे जे उद्दिष्ट बनवले आहे ते या परिषदेच्या माध्यमातून हे पुढे गेले आहे.
- एम. प्रभाकर राव, (अध्यक्ष, नॅशनल सीड एसोसिएशन ऑफ इंडिया)
