नाशिक : शासनाच्या कृषी विभागामार्फत कृषी क्षेत्रात उत्कृष्ट व नाविण्यपूर्ण कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी विविध कृषी पुरस्कार (Krushi Puraskar) प्रदान करण्यात येतात. सन 2024 वर्षासाठीच्या कृषी पुरस्कारांसाठी पात्र शेतकरी, व्यक्ती व गट यांनी विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रवींद्र माने यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
असे आहेत पुरस्कार व त्यांचे स्वरूप
डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार हा कृषी क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्ती दिला जातो. पुरस्कार रक्कम रूपये 3 लाख अशी आहे. कृषी उत्पादन व तंत्रज्ञानात उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यास वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराची रक्कम रूपये 2 लाख आहे.
जिजामाता कृषी भूषण पुरस्कार हा कृषी क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या महिला शेतकऱ्यांसाठी असून पुरस्काराची रक्कम रूपये 2 लाख आहे. सेंद्रीय शेती पुरस्कार हा सेंद्रीय शेती पद्धतीचा अवलंब करून यशस्वी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना दिला जातो. या पुरस्काराची रक्कम रूपये 2 लाख अशी आहे. वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार हा कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती/ गट/ संस्था इत्यादींना दिला जातो.
तसेच रूपये 1.20 लाख या पुरस्काराची रक्कम आहे. उद्यान पंडित पुरस्कार हा फलोत्पादन ( फळे, भाजीपाला, फुले) या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास दिला जातो व पुरस्काराची रक्कम रूपये 1 लाख इतकी आहे. युवा शेतकरी पुरस्कार रक्कम रूपये 1.20 लाख आणि वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे स्वरूप रूपये 44 हजार असे आहे. याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.