Join us
Daily Top 2Weekly Top 5

कांद्यासाठी कर्ज काढलं, एखाद्यानं मक्याचं तणनाशक कांद्यावर फवारलं, शेतकऱ्यानं करायचं काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 16:10 IST

Agriculture News : कांदा पिकावर अज्ञात व्यक्तीने मका पिकासाठी वापरण्यात येणारे तणनाशक फवारल्याची घटना समोर आली.

Agriculture News :    येवला तालुक्यातील ममदापूर येथे चिंधू गुडघे या शेतकऱ्याच्या कांदा पिकावर अज्ञात व्यक्तीने मका पिकासाठी वापरण्यात येणारे तणनाशक फवारल्याची घटना समोर आली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

चिंधू गुडघे यांची ममदापूर शिवारात शेती असून, त्यांनी यावर्षी कांद्याची लागवड केली होती. त्यात जवळपास तीन एकर क्षेत्रावर कांदा लागवड करता येईल, एवढे कांद्याची रोपे आणि एक एकर क्षेत्रावर कांद्याचे उभे पीक होते. मात्र अज्ञात व्यक्तीने अंदाजे १५ दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास मका पिकासाठी वापरण्यात येणारे तणनाशक औषध फवारले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 

गेल्या दोन दिवसांपूर्वी गुडघे यांना कांद्याची पाने रोपे कोमेजलेली आणि उभे पीक जळाल्यासारखी, वाळू लागलेले दिसून आले. गुडघे यांनी महाराष्ट्र बँकेकडून कांदा लागवडीसाठी १ लाख २५ हजार रुपये कर्ज काढले होते. त्यातच मुलगी अकरावी व मुलगा नववीमध्ये शिक्षण घेत आहे. आता बँकेचे हप्तेही थकतील आणि मुलांच्या शिक्षणासाठीही अडचणी उभ्या राहणार असल्याने संपूर्ण कुटुंब चिंताग्रस्त झाले असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

तणनाशक फवारल्यास त्याचा परिमाण पंधरा दिवसांनंतर दिसू लागतो. आधी रोपावर औषध फवारल्याचे लक्षात आले. नंतर कांद्यावरही तेच तणनाशक फवारल्याचे लक्षात आले. यामुळे तीन एकर क्षेत्र लागवड होईल, एवढे कांदा रोप आणि एक एकर कांदा पीक वाया गेले आहे.- चिंधू गुडघे, शेतकरी, ममदापूर

गेल्या काही महिन्यात तालुक्यातील काही गावात पूर्ववैमनस्यातून किंवा विक्षिप्त व्यक्तींकडून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकावर तणनाशक फवारणी केल्याचे माध्यमातून समजले. ही बाब गुन्हेगारी स्वरूपाची असून, अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींना निश्चितच न्यायालयासमोर उभे केले जाईल.- संदीप मंडलिक, पोलिस निरीक्षक

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer's onion crop destroyed by herbicide; faces debt, education woes.

Web Summary : Yeola farmer's onion crop decimated by mistakenly sprayed herbicide, causing huge losses. Farmer Chindhu Gudghe faces financial ruin and struggles to educate his children due to crop failure and existing bank debt.
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतीशेतकरीकृषी योजना