Amba Mohar : यंदा तुळजापूर तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, तालुक्यातील बहुतांश भागांत आंब्याच्या झाडांवर नेहमीपेक्षा अधिक आणि घनदाट असा मोहोर फुललेला दिसून येत आहे. (Amba Mohar)
गावागावांतील शिवारात, घरासमोरील झाडांपासून ते मोठ्या आंबा बागांपर्यंत सर्वत्र पांढऱ्या मोहोराने झाडे बहरून गेली असून, बागांनी जणू सोन्याची झळाळी ओढल्याचे चित्र दिसत आहे. (Amba Mohar)
नैसर्गिक हवामानाची साथ लाभल्याने येत्या हंगामात आंब्याचे विक्रमी उत्पादन होण्याची आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
कृषी विभागाकडील माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यात सुमारे १ हजार २४८ हेक्टर क्षेत्रावर आंबा बागांची लागवड आहे. याशिवाय, प्रत्येक गावात शेती शिवारात आणि घराजवळही आंब्याची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत.
साधारणपणे ठराविक कालावधीत आणि मर्यादित प्रमाणात येणारा मोहर यंदा मात्र अपवादात्मकरीत्या सर्वत्र आणि एकसारखा फुललेला दिसत आहे.
मागील काही महिन्यांतील हवामान बदल, रात्रीचे तुलनेने कमी तापमान, पहाटे पडणारे दव आणि दिवसा तीव्र उष्णतेचा अभाव या सर्व घटकांनी आंब्याच्या झाडांसाठी पोषक वातावरण निर्माण केले आहे.
थंडी आणि कोरड्या हवामानाचा योग्य समतोल
यंदा हिवाळ्यात पडलेली थंडी आणि कोरड्या हवामानाचा योग्य समतोल आंब्याच्या झाडांना लाभला. विशेषतः सलग काही दिवस १० ते १५ अंश सेल्सिअस तापमान राहिल्याने आंब्याच्या झाडांमध्ये 'फ्लोरिजन' नावाचे संप्रेरक तयार होण्यास चालना मिळाली.
या संप्रेरकामुळे फुलकळी फुटून मोठ्या प्रमाणात मोहोर येण्यास मदत झाली, अशी माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली. त्यामुळे बागांमध्ये मोहर एकसारखा आणि घनदाट दिसून येत आहे.
मोहर उशिरा, पण भरघोस
ऑक्टोबर महिन्यापर्यंत पावसाचा कालावधी लांबल्याने यंदा मोहर येण्यास सुमारे पंधरा दिवसांचा उशीर झाला.
साधारणपणे नोव्हेंबरमध्ये पूर्ण होणारा मोहर यंदा डिसेंबरमध्ये पूर्ण झाला असला, तरी मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मोहर अधिक जोमदार आणि प्रमाणात जास्त असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
मागील हंगामात काही ठिकाणी उत्पादन कमी झाल्याने झाडांमध्ये अन्नसाठा (कर्बोदके) भरपूर होता. तसेच ऑक्टोबरनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने झाडांना नैसर्गिक पाण्याचा ताण मिळाला. परिणामी झाडांची पाने वाढण्याची प्रक्रिया थांबून ती पुनरुत्पादनाकडे, म्हणजेच फुलोऱ्याकडे वळली.
पुढील काही महिने निर्णायक
मात्र, अंतिम उत्पादनाचा अंदाज लावण्यासाठी येणारे काही महिने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. अवकाळी पाऊस, गारपीट, तापमानात अचानक बदल, तसेच कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला नाही, तर हा मोहोर टिकून राहून मोठ्या प्रमाणात फळधारणा होण्याची शक्यता आहे.
सध्या स्वच्छ व कोरडे हवामान असल्याने मोहरावर किडींचा फारसा प्रादुर्भाव दिसून येत नाही. मात्र हवामानात बदल झाल्यास फवारणीचा खर्च वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशेचे हास्य
सध्या तालुक्यात सर्वत्र दिसणारा हा आंब्याचा मोहोर शेतकऱ्यांच्या तसेच नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि आशा घेऊन आला आहे.
दरवर्षी हवामानाच्या लहरीपणामुळे उत्पादनाबाबत अनिश्चितता असते; मात्र यंदाची सुरुवात समाधानकारक असल्याने निसर्गाची साथ कायम राहिल्यास हा हंगाम आंबा उत्पादकांसाठी लाभदायक ठरण्याची शक्यता आहे.
सध्याचे कोरडे व थंड हवामान आंब्याच्या मोहरासाठी अतिशय पोषक आहे. योग्य कीड व्यवस्थापन आणि पाणी नियोजन केल्यास यंदा दर्जेदार व भरघोस उत्पादन अपेक्षित आहे.- रमेश जाधव, आंबा उत्पादक शेतकरी, आरळी (खुर्द)
शेतकऱ्यांना सूक्ष्म अन्नद्रव्ये व पाणी व्यवस्थापनाबाबत योग्य मार्गदर्शन दिल्यास उत्पादनात निश्चित वाढ होईल. - आबासाहेब देशमुख, तालुका कृषी अधिकारी
