AI Sugarcane Farming : यंदा धाराशिव जिल्ह्यात समाधानकारक पर्जन्यमान झाल्याने जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, त्याचा थेट परिणाम ऊस लागवडीवर झाला आहे.(AI Sugarcane Farming)
जिल्ह्यातील ऊस क्षेत्र ५५ हजार हेक्टरवर पोहोचले आहे. या वाढलेल्या क्षेत्रातून शेतकऱ्यांना अधिक उत्पादन व नफा मिळावा, यासाठी जिल्ह्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे.(AI Sugarcane Farming)
पहिल्या टप्प्यात किमान २० टक्के म्हणजेच सुमारे ११ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस 'एआय'च्या निगराणीत आणण्याची तयारी सुरू आहे.(AI Sugarcane Farming)
जिल्ह्यात ऊस उत्पादनवाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू करण्यात येत असून, कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या नव्या तंत्रज्ञानासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. याबाबत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी मंगळवारी कृषी अधिकारी व साखर कारखानदारांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली.(AI Sugarcane Farming)
या बैठकीत ऊस लागवड अधिक असलेली गावे तसेच ठिबक सिंचन व आधुनिक तंत्रज्ञान वापरणाऱ्या शेतकऱ्यांची तातडीने निवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
२५ ते ४० शेतकऱ्यांचा एक क्लस्टर तयार केला जाणार असून, प्रत्येक साखर कारखान्याने किमान १० क्लस्टर म्हणजे सुमारे २५० शेतकरी सहभागी करून २० टक्के ऊस क्षेत्र एआय तंत्रज्ञानाखाली आणण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
एआय तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीसाठी इच्छुक शेतकऱ्यांशी करारनामे करून घेण्याच्या सूचना कारखानदार व कृषी विभागाला देण्यात आल्या आहेत. हे सर्व करारनामे २० जानेवारीपर्यंत संकलित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तसेच साखर कारखान्यांची आर्थिक मदत मिळून शेतकऱ्यांना कमी खर्चात आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे.
दीड हजार शेतकरी आधीच लाभार्थी
जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे दीड हजार शेतकऱ्यांच्या उसाच्या फडांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. या तंत्रज्ञानामुळे उत्पादनात सुमारे ४० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता असून, पाणीवापर आणि उत्पादन खर्चात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत बचत होत असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. काही शेतकऱ्यांनी तर एकरी १०० टनांपर्यंत ऊस उत्पादन घेतल्याचे उदाहरणे समोर आली आहेत.
अवघे ९ हजार रुपये शेतकऱ्यांचा खर्च
एआय तंत्रज्ञानासाठी प्रतिहेक्टरी सुमारे २५ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून पहिल्या टप्प्यात ९ हजार २५० रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे साखर कारखान्यांकडून ६ हजार ७५० रुपयांची मदत मिळणार असून, उर्वरित केवळ ९ हजार रुपयेच शेतकऱ्यांना भरावे लागणार आहेत.
या उपक्रमामुळे ऊस शेती अधिक शाश्वत, खर्चिकदृष्ट्या परवडणारी आणि उत्पादनक्षम होणार असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या एआय तंत्रज्ञानाधारित उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.
