मनीष तसरे
जास्त जागा व्यापणारे, बहर अनियमित असलेले आणि उत्पादनासाठी दीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागणारे आंब्याचे झाड काळानुरूप मागे पडत असल्याचे चित्र होते.(AI Mango Farming)
मात्र 'फळांचा राजा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याला नवसंजीवनी मिळाली असून, ती थेट कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आहे.(AI Mango Farming)
आता आंबा कमी जागेत, कमी कालावधीत फळणार आणि त्याच्या देखभालीपासून रोगनियंत्रणापर्यंत सर्व माहिती थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मिळणार आहे.(AI Mango Farming)
पूर्वी 'आबाने लावलेला आंबा नातवाने खावा' अशी म्हण प्रचलित होती. मात्र तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ही म्हण बदलत असून, 'मीच झाड लावणार आणि मीच आंबे खाणार' ही संकल्पना प्रत्यक्षात येत आहे.(AI Mango Farming)
एआय तंत्रज्ञान व अतिघन लागवड पद्धतीमुळे आंबा शेती आता अधिक फायदेशीर आणि शाश्वत ठरणार आहे.(AI Mango Farming)
अतिघन लागवडीचा प्रयोग यशस्वी
अमरावती येथील श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर आंब्याची अतिघन लागवड पद्धतीने प्रात्यक्षिके सुरू आहेत. येथे १ बाय ४ मीटर अंतरावर गादीवाफ्यावर आंब्याची रोपे तयार करण्यात आली असून, एकरी सुमारे ५०० कलमे लावली जात आहेत. केसर, आम्रपाली आणि रत्ना या सुधारित जातींची लागवड करण्यात आली आहे.
ठिबक सिंचनाद्वारे पाणी व खत व्यवस्थापन केले जात असून, झाडांना साधारण तिसऱ्या वर्षापासून फळधारणा सुरू होते, अशी माहिती येथील शास्त्रज्ञांनी दिली.
उपग्रहाशी जोडलेले एआय तंत्रज्ञान
या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे एआय आधारित पीक देखरेख प्रणाली. शेतात बसविण्यात आलेली यंत्रणा उपग्रहाशी जोडलेली असून ती मोबाईल ॲपशी समन्वय साधते.
जमिनीतील ओलावा, तापमान, आर्द्रता, खत व पाण्याची गरज, झाडांवरील रोग-किडींची लक्षणे यांची माहिती थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मिळते. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेणे शक्य होते आणि उत्पादनात वाढ होते.
पारंपरिक पद्धतीला पर्याय
आंब्याची पारंपरिक लागवड पद्धत १०x१० मीटर अंतरावर आधारित आहे. या पद्धतीत झाडे मोठी होतात, जागा व्यापतात आणि उत्पादनास जास्त कालावधी लागतो. त्याऐवजी ५x५ मीटर किंवा १x४ मीटर अंतरावर अतिघन लागवड केल्यास प्रतिहेक्टर झाडांची संख्या चारपटीने वाढते.
आधुनिक छाटणी तंत्रामुळे झाडांचा घेर नियंत्रित ठेवता येतो, सूर्यप्रकाश योग्य प्रमाणात पोहोचतो आणि फळधारणा नियमित होते.
एआय सांगणार आंब्याचे 'आरोग्य'
श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर बसविण्यात आलेल्या एआय प्रणालीमुळे आंब्याच्या झाडांचे आरोग्य सतत तपासले जाते.
जमिनीतील पोषणद्रव्यांची कमतरता, रोगांचा प्रारंभ, किडींचा प्रादुर्भाव याबाबत अचूक सूचना मिळत असल्याने वेळेवर उपाययोजना करता येतात. परिणामी उत्पादन खर्च कमी होऊन दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते.
विदर्भात पुन्हा अमराई फुलणार
अतिघन आंबा लागवड व एआय तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विदर्भातील गावागावांत पुन्हा अमराई फुलू शकते. कमी जागेत हमखास उत्पन्न देणारे पीक शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
अतिघन आंबा लागवडीमुळे आणि एआय तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विदर्भात पुन्हा अमराई दिसेल. शेतकऱ्यांना स्थिर व खात्रीशीर उत्पन्न देणारे पीक उपलब्ध होईल.- चंद्रशेखर देशमुख, प्राचार्य, श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय
