अमरावती : शेती अधिक शाश्वत, आधुनिक आणि उत्पादनक्षम व्हावी, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून आता कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी तब्बल ५०० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.(AI for Farmers)
या माध्यमातून शेती क्षेत्रात निश्चितच एक परिणामकारक आणि दूरगामी बदल घडवून आणू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिली.(AI for Farmers)
अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या परिसरात शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त आयोजित मुख्य समारंभात ते बोलत होते.(AI for Farmers)
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते, तर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.(AI for Farmers)
शेतीत तंत्रज्ञानाची नवी क्रांती
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, शेतीत यांत्रिकीकरणाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होणे अत्यावश्यक आहे. हवामान बदल, पाण्याची टंचाई, उत्पादन खर्चात वाढ आणि बाजारातील अनिश्चितता या आव्हानांवर मात करण्यासाठी 'एआय'सारख्या प्रगत तंत्रज्ञानाची मोठी भूमिका असणार आहे.
पीक पद्धती, उत्पादन अंदाज, रोग-कीड व्यवस्थापन, पाणी वापराचे नियोजन आणि बाजार माहिती या सर्व बाबींमध्ये 'एआय'चा वापर करून शेतकऱ्यांना थेट लाभ देण्याचा शासनाचा मानस आहे.
कोरडवाहू ते बागायती शेतीकडे वाटचाल
नवीन तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून कोरडवाहू शेती हळूहळू बागायती शेतीकडे वळवण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 'शेती ही केवळ उपजीविकेचे साधन न राहता शाश्वत आणि नफ्याची बनेल, यासाठी शासन कटिबद्ध आहे,' असे ते म्हणाले.
भाऊसाहेब देशमुखांच्या विचारांना अभिवादन
भाषणात मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या कार्याचा गौरव केला. भाऊसाहेबांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार स्वीकारताना मला प्रेरणा मिळेल, या भावनेतूनच हा सन्मान स्वीकारला असल्याचे त्यांनी सांगितले. भाऊसाहेबांचे शिक्षण, शेती आणि ग्रामीण विकासाबाबतचे विचार आजही मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.
परिवर्तन मिशन म्हणून कृषी विकास
राज्यातील कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास हा शासनाचा 'परिवर्तन मिशन' असून, त्यात आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, शेतकरी प्रशिक्षण आणि बाजार व्यवस्थेचा समन्वय साधण्यात येणार आहे.
एआयसाठी जाहीर केलेला ५०० कोटींचा निधी हा त्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असून, त्यातून महाराष्ट्रातील शेतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला केंद्रीय आयुष मंत्री प्रताप जाधव, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर, खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार बळवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके, आमदार परिणय फुके, आमदार संजय कुटे, आमदार राजेश वानखडे, आमदार प्रवीण तायडे, आमदार उमेश यावलकर, माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, आमदार प्रताप अडसड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
