नाशिक : सिन्नर तालुक्यातील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील (Malegoan MIDC) अनेक कारखान्यांमधून दूषित व रसायनयुक्त पाणी परिसरात सोडले जात असल्याने सिन्नरजवळील मळहद्द परिसरातील सुमारे ९० शेतकऱ्यांची ४५० एकर शेतजमीन नापीक होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. केमिकलयुक्त दूषित (Chemical Water) पाण्याने पिके सडू लागली असून, औद्योगिक वसाहतीचे जलप्रदूषण मुळावर उठल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या विविध कारखान्यांतून सोडण्यात येणारे रसायनयुक्त दूषित पाणी हे विहिरी व बोअरवेलला उतरत असल्याने पिकांना हे पाणी दिल्यास पिके सडून जात असल्याचा (Impact On Crops) आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या दूषित पाण्याचा फटका यंदा परिसरातील २५० एकरांवरील द्राक्षबागांना बसला असून, द्राक्षांची पूर्ण वाढ होण्याच्या आधीच ते सडून जात असल्याने शेतकऱ्यांना लाखोंचा फटका सहन करावा लागत आहे.
परिणामी, परिसरातील बागांमधील द्राक्ष सडणे, गहू पिवळा पडणे, मक्याची वाढ न होणे असे प्रकार घडत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सदर कारखान्यांनी तत्काळ दूषित पाणी सोडणे बंद करावे, अन्यथा प्रजासत्ताक दिनी परिसरातील शेतकरी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
शेतजमिनीचा रंग लाल
माळेगाव एमआयडीसीतील विविध कारखान्यांचे दूषित पाणी शेतशिवारातून वाहत असल्याने परिसरातील शेतजमिनीमधील मातीचा रंग पूर्णपणे लाल झाला आहे. तसेच शेतांमधून वाहणाऱ्या पाण्याचाही रंग लाल, हिरवा, काळा असून, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. विविध आजारही जडत आहेत.
पाण्यात मोठ्या प्रमाणात क्षार...
हे दूषित पाणी शेतातूनच वाहत असते. तेच पाणी विहिरींना उतरत असून, त्यामुळे पाण्यात मोठ्या प्रमाणावर क्षार तयार झाले आहे. सामान्य विहिरीच्या पाण्याचा टीडीएस २०० ते २५० पर्यंत असतो. मात्र, येथील विहिरींच्या पाण्याचा टीडीएस १७०० ते १८०० इतका असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.
एक एकर क्षेत्रावर द्राक्षबागांची लागवड केली होती. मात्र, कारखान्यांचे दूषित पाणी विहिरींना उतरत असून, दुसरा पर्याय नसल्याने हेच पाणी बागेला द्यावे लागले. त्यामुळे संपूर्ण बाग तसेच द्राक्षमणी सडून गेले आहेत.
- महेश उगले, द्राक्ष उत्पादक शेतकरी
कारखान्यांच्या दूषित पाण्याविरोधात शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलने करूनही कारवाई झाली नाही. कारखाने व प्रदूषण नियामक मंडळाकडून केवळ आश्वासने दिली जातात. शेतीचे उत्पन्न मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. पाणी न थांबल्यास दि. २६ जानेवारी रोजी माझ्यासह अनेक शेतकरी आत्मदहन करणार आहेत.
- शशिकांत गाडे, माजी सभापती, सिन्नर बाजार समिती