Pune : रब्बी हंगामाची सुरुवात होत असून या हंगामात फुल पिकांची लागवड आणि उत्पादना संदर्भातील प्रशिक्षणाचा कार्यक्रम पार पाडला. शनिवारी पंतप्रधानांच्या पीएम धनधान्य कृषी योजनेचा व डाळी अभियानाचा शुभारंभ झाला. याचवेळी भारतीय कृषी संशोधन परिषद पुष्पविज्ञान संशोधन संचालनालय (ICAR-DFR), पुणे येथे हा प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
सदर कार्यक्रमाला १५३ शेतकरी, विद्यार्थी आणि युवा उद्योजक उपस्थित होते. सर्व सहभागींस ICAR-DFR च्या शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधण्याची आणि पंतप्रधानांचे नवे कृषी उपक्रम PMDDKY आणि डाळी अभियान याविषयीचे मार्गदर्शन ऐकण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. जी. बी. कदम यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले. त्यांनी रब्बी हंगामातील प्रमुख फुलझाडांच्या सुधारित लागवड पद्धतीबद्दल माहिती देत, शेतकऱ्यांना उच्च उत्पादनक्षम फुलांच्या जाती अवलंबण्याचे आवाहन केले.
डॉ. डी. एम. फिरके यांनी शेतीत परागणकांच्या संवर्धनाचे आणि जैवविविधतेच्या वृद्धीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी ICAR-DFR तर्फे विकसित करण्यात आलेल्या जैवविविधता व परागणक कीट्स विषयी शेतकऱ्यांना माहिती दिली.
डॉ. विशाल वानखेडे यांनी नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून टिकाऊ व निसर्गस्सेही कृषी प्रणाली प्रोत्साहनाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत, ब्रह्मास्त्र, नीमास्त्र, अग्मास्त्र आणि दशपर्णी अर्कयांसारख्या नैसर्गिक जैव-इनपुट्सच्या तयार करण्याची प्रात्यक्षिके दिली, ज्यामुळे शेतीचा खर्च कमी होतो, बाह्य इनपुट्सवरील अवलंबित्व घटते आणि मातीचे आरोग्य सुधारते.
डॉ. टी. एन. साहा यांनी ICAR-DFR तर्फे विकसित विविध फुलझाडांच्या जातींबद्दल माहिती दिली व फुलशेतीतील मूल्पवर्धनाच्या संधींचा आढावा घेतला. डॉ. प्रभा के. यांनी फुलझाडांच्या रोग निदानासाठी तयार केलेली पॉकेट पुस्तिका वितरित केली आणि सामान्य रोगांचे नियंत्रण उपाय सांगितले.
डॉ. संजय कड यांनी शेतकऱ्यांच्या संघटनांचे (उदा. शेतकरी उत्पादक कंपन्सा (FPOs) व शेतकरी गट) महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी लघु शेतकऱ्यांना इनपुट खर्च कमी करून, ज्ञानवाटप, बाजारपेठेपर्यंत पोहोच, बँक साखळ्या व शासकीय योजनांचा लाभ घेऊन उत्पन्न वाढविण्याचे मार्ग सांगितले. तसेच त्यांनी ड्रोनद्वारे पोषक द्रव्य फवारणीचे फायदेही स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या शेवटी ट्युबरोझ, गुलाब व वार्षिक फुलझाडांच्या शेतांना भेट देऊन शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक अनुभव देण्यात आला. समारोपप्रसंगी डॉ. के. व्ही. प्रसाद, संचालक, ICAR-DFR पुणे यांनी सर्व सहभागींचे अभिनंदन करून पुढील काळात इच्छुक शेतकऱ्यांसाठी अधिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचे आश्वासन दिले.