Agriculture News : हवामान बदल, शेतमालाच्या भावातील चढउतार आणि वाढता उत्पादन खर्च शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेला असला तरी शेती आता केवळ पावसावर अवलंबून न राहता व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि धोरणांवर आधारित होत आहे. शेतकरी तंत्रज्ञानावर स्वार होऊन हवामानाशी जुळवून घेणारी 'शेती संकल्पना' स्वीकारत आहे.
पाण्याचा कार्यक्षम वापर, सूक्ष्म सिंचन, पीक वैविध्य, कमी कालावधीची व ताण सहन करणारी वाणे यामुळे जोखीम कमी करण्यावर अधिक भर असेल. 'पाऊस कधीही, कसाही आला तरी शेती वाचवायची कशी?' याचा विचार शेतकरी करत असून तसे तंत्रज्ञान आकारास येण्यास हे वर्ष फलदायी ठरेल.
तंत्रज्ञानाचा व्यवहार्य वापर :
ड्रोन, माती व पाण्याचे परीक्षण, मोबाईलवर आधारित कृषी सल्ला आणि डेटा-आधारित निर्णयामुळे योग्य माहितीवर आधारित शेतीचे युग सुरू झाले आहे. नवे तंत्रज्ञान उत्पादनातील अनिश्चितता हाताळण्यास मदत करत आहे. या दिशेने तरुण शेतकरी गट व स्टार्टअप काम करताना दिसत आहे.
बाजाराभिमुख शेतीचा वाढता कल :
शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (एफपीओ) शेतमालाची थेट विक्री, प्रक्रिया उद्योगाची जोड आणि निर्यातक्षम पिकाच्या उत्पादनास प्राधान्य दिले जात आहे. प्रयोगशील तरुण शेतकरी यात पुढाकार घेत आहेत. शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहण्याची मानसिकता आणखी रुजेल.
कृषी स्टार्टअप्स :
सरकारी योजना, खासगी गुंतवणूक आणि कृषी स्टार्टअप्स यामुळे शेतीत नव्या संधी निर्माण होत आहेत. बाजारपेठेचा शोध आणि दर्जेदार उत्पादनासाठी कृषी स्टार्टअप्सचा यावर्षी अधिक चांगला वापर होईल. त्यामुळे २०२६ हे वर्ष हमखास यशाचेच नव्हे, तर योग्य निर्णय, परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि ज्ञानाधारित शेती करणाऱ्यांसाठी आशादायी ठरणार आहे.
- विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्म्स, नाशिक
