नाशिक : सध्या शेतमजुरांची कमतरता प्रकर्षाने जाणवू लागली आहे. ग्रामीण भागातून शहरांकडे वाढते स्थलांतर, बदलती जीवनशैली आणि मजुरीचे वाढते दर यामुळे शेतकऱ्यांसमोर कामगारांचा प्रश्न उभा राहिला आहे. अशा कठीण परिस्थितीत महिलांची जबाबदारी वाढत असून, त्यांनीही शेतीत पुरुषांप्रमाणे खांद्याला खांदा लावून काम करत आहे. याचेच उत्तम उदाहरण कोळगाव येथील दीपा प्रवीण तनपुरे यांनी दाखवले आहे.
मजुरांची कमतरता आणि मजुरीचे दर लक्षात घेता, त्यांनी स्वतःच्या शेतातील सोयाबीन पिकावर फवारणी करण्याची जबाबदारी स्वतः घेतली. पाठीवर फवारणीचे मशीन बांधून उन्हात उभे राहून त्यांनी पिकांचे रक्षण केले. शेतीतील अशा जोखमीच्या कामासाठी पुढे येत त्यांनी ग्रामीण महिलांची ताकद समाजासमोर दाखवून दिले.
कृषी तज्ज्ञांच्या मते, या समस्येवर उपाय म्हणून सामूहिक शेती पद्धतीचा अवलंब, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे अत्यावश्यक आहे. महिलांची भूमिका केवळ घरकामापुरती मर्यादित नसून शेतीतील खत टाकणे, औषधांची फवारणी करणे, तण काढणे, पिकांची निगा राखणे, अशा जबाबदाऱ्याही त्या समर्थपणे पार पाडतात.
शेतकरी महिलांसाठी प्रेरणादायी
तनपुरे यांचा आत्मविश्वास शेतकरी महिलांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. परिस्थितीमुळे आर्थिक ताण व आरोग्याचे प्रश्न उभे राहतात. मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी यामुळे शेतकऱ्यांच्या खिशावर भार येतो. तर दुसरीकडे फवारणीसारख्या कामांमुळे विषारी औषधांच्या संपर्कात येऊन महिलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.
हेही वाचा : दहावी उत्तीर्ण आहात, गावातच काम मिळणार, दीड लाख अनुदान मिळतंय, इथं अर्ज करा