गडचिरोली : पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा हे जिल्हे तलावाचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. या तलावात मोठ्या प्रमाणात शिंगाड्याची शेती केली जाते. या वर्षात चांगल्या पर्जन्यवृष्टीचा परिणाम म्हणून यंदा शिंगाड्याचे चांगले पीक असून, शिंगाड्याची शेती फायद्याची ठरली आहे.
शिंगाड्याचे उत्पादन हे नगदी पीक आहे. ज्या ठिकाणी पाण्याचा साठा राहू शकते, अशा ठिकाणी शिंगाड्याचे उत्पादन हमखास येते. जिल्ह्यातील मामा तलावात मोठ्या प्रमाणात शिंगाड्याचे उत्पादन होत असते. दरम्यान, मागील काही वर्षात पेसा कायद्याअंतर्गत काही तलाव गाव समित्यांकडे वर्ग झाले व काही तलाव पंचायत समिती प्रशासनाने लीज तत्त्वावर लिलावात काढले.
सदर तलाव परंपरागत शिंगाड्याची शेती करणाऱ्या कहार बांधवांना लिलावाच्या माध्यमातून घ्यावे लागतात. आता स्थानिक प्रशासन काही तलावाचे लिलाव करीत असून, वैरागड येथील गोटेबोडी, मठाची बोडी, माराई तलाव आदी तलाव लिलाव तत्त्वावर शिंगाडे उत्पादकांना दिले जाते.
शिंगाड्याच्या उत्पादनाच्या महिन्यांत होते. तलाव बोड्या दोन ते तीन फूट पाणीसाठा झाला की, शिंगाड्याची लागवड केली जाते. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांपासून शिंगाड्याचे उत्पादन हाती येण्यास सुरुवात होते. हिवाळ्याच्या दिवसात शिंगाड्याला मोठी मागणी असते. आता हा व्यवसाय करणारे शेतकरी वाढले असून, ज्याच्याकडे कृषी सिंचनाची व्यवस्था आहे, असे अनेक शेतकरी वैरागड परिसरात शिंगाड्याची शेती करीत आहेत.
या वर्षात जोरदार पाऊस बरसला. सध्या सुरू असलेल्या चांगल्या हवामानाचा परिणाम म्हणून शिंगाड्याची शेती चांगली असून, आता शिंगाड्याला बाजारात चांगला भाव मिळत आहे.
- श्रीराम अहिरकर, शिंगाडे उत्पादक, वैरागड
ज्या शेतकऱ्याकडे सिंचन सुविधा उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनी थोडीफार तरी शिंगाड्याची शेती करावी. ही शेती धान उत्पादनाला जोड व्यवसाय ठरतो. शिंगाडा उत्पादनासाठी काही मार्गदर्शन लागल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.
- नीलेश गेडाम, तालुका कृषी अधिकारी, आरमोरी