नाशिक : नाशिक जिल्ह्यातील फळ उत्पादकांचे मे महिन्यापासूनच्या पावसाने कंबरडे मोडले आहे. तब्बल ६० हजार हेक्टरवरील बहुवार्षिक फळ पिकांवर नांगर फिरविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. यात सर्वाधिक ४५ हजार हेक्टरवर द्राक्ष बागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
नाशिक जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांत दोन द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेच्या नुकसानीला आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वतःला संपवल्याचे समोर आले आहे. या घटनेने शेतकऱ्यांसमोरील आर्थिक विवंचनेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादक शासनाकडून मदतीसाठी टाहो फोडत आहे. संततधार पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष वेलींना सूर्यप्रकाश न मिळाल्याने फळधारणा देखील झालेली नाही. उत्पादन घटणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
द्राक्ष यंदा आंबट होणार; डाळिंबाचे भावही कडाडले
३० टक्के क्षेत्रावरील डाळिंबाचे पूर्ण नुकसान झाले, तर ७० टक्के क्षेत्रावरील डाळिंबावर तेल्या रोगाचा प्रार्दुभाव झाल्याने त्याची फळाचा आकार खुंटला, तसेच डागी फळ हाती आले. शिवाय शेतातून मालही कमी निघाला. या साऱ्या कारणांनी बाजारात सध्या डाळिंब २०० ते २५० रुपये या भावाने मिळत असून, पुढच्या तीन महिन्यांनी द्राक्षांचे आगमन बाजारात होईल, तेव्हा डाळिंबासारखीच गत द्राक्षाची होईल. परिणामी द्राक्षाचा दरही १०० रुपये किलोच्यावर राहील, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
डाळिंबाच्या बागांचेही झाले नुकसान
द्राक्षापाठोपाठ नाशिक जिल्ह्यात डाळिंब पिकांचेही भरघोस उत्पादन घेतले जाते. खरीप हंगामात तब्बल २७ हजार हेक्टरवर डाळिंबाची लागवड झाली होती. परंतु, त्यातील पाच हजार हेक्टरवरील डाळिंब बागांचे पूर्णतः नुकसान झाले असून, बाकीच्या भागात ५० टक्के पीक हाती आले आहे. मे महिन्यापासूनच्या सततच्या पावसाने पिकावरील औषधे व देखभालीचा खर्च वाढला. हा खर्च पूर्वी एकेरी डाळिंब बागेसाठी एक ते सव्वा लाख रुपये येत होता. तोच खर्च एक लाखाने वाढला. त्यामुळे डाळिंब उत्पादकांचे उत्पन्न घटले.
मागील वर्षी एक लाख मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात
२०२४-२५ च्या हंगामात, आर्थिक वर्षअखेरपर्यंत नाशिक जिल्ह्यातून परदेशात १ लाख १० हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. युरोपियन देशांसह युनायटेड अरब, रशिया, सौदी अरेबिया, मलेशिया, सिंगापूर, ओमान, चीन आणि श्रीलंका यांसारख्या देशांमध्ये ही द्राक्षे निर्यात केली. यंदा अवकाळी पावसाने परदेशातील निर्यात थांबून परकीय चलन पदरात पडणार नाही.
घडच दिसत नसल्याने उत्पादकांमध्ये चिंता
नाशिक जिल्ह्यातील हजारो हेक्टर द्राक्ष बागांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. खरड छाटणी झाल्यानंतर द्राक्ष बागांची काडी परिपक्व होणं गरजेचं होतं, परंतु सतत होणाऱ्या पावसामुळे झाडांना सूर्यप्रकाश न मिळाल्याने फळधारणा देखील झालेली नाही. अनेक द्राक्ष झाडाला घडच दिसत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
