Join us

Kanda Lagvad : कांदा लागवडीच्या क्षेत्रात यंदा घट? नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात लागवड किती झाली? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 16:30 IST

Kanda Lagvad : कांदा लागवडीच्या क्षेत्रात घट आल्यामुळे कांदा उत्पादनाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Kanda Lagvad : नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत कांदा लागवडीच्या (Kanda Lagvad) क्षेत्रात यंदा घट झाल्याचे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. कांदा लागवडीच्या क्षेत्रात घट आल्यामुळे कांदा उत्पादनाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र हंगाम लांबणीवर (Onion Sowing) पडल्याने लागवडीस उशीर होत आहे. नाशिक जिल्ह्यात 99 हजार 195 हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील कांदा लागवड झाली आहे. 

पावसाच्या असमान वितरणामुळे नाशिक (Nashik District) जिल्ह्यातील नाशिक, पेठ, त्र्यंबकेश्वर आणि सुरगाणा या चार तालुक्यांत खरीप, लेट खरीप आणि रब्बी (उन्हाळी) कांद्याची लागवड होऊ शकलेली नाही. विभागातील जिल्हा निहाय रब्बी कांदा लागवड (Rabbi Kanda Lagvad0 आकडेवारी पाहिली असता नाशिक जिल्ह्यात कांदा लागवड ची सरासरी क्षेत्र 01 लाख 93 हजार 173.55 हेक्टर आहे. तर यंदा म्हणजे 2024-25 मध्ये 88 हजार 683.67 हेक्टर वर कांदा लागवड झालेली आहे. धुळे जिल्ह्यात कांदा लागवडीची सरासरी क्षेत्र 16 हजार 495 असून आतापर्यंत 6530 हेक्टरवर लागवड झाली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात कांदा लागवड तसेच सरासरी क्षेत्र 1454 हेक्टर आहे. तर आतापर्यंत 973.40 हेक्टर वर कांदा लागवड झाली आहे. जळगाव जिल्ह्यात कांदा लागवड सरासरी क्षेत्र 10 हजार 213 हेक्टर असून आतापर्यंत 03 हजार 08 हेक्‍टरवर लागवड झाली आहे. अशा पद्धतीने उत्तर महाराष्ट्रात जवळपास 99 हजार 195 हेक्‍टरवर आत्तापर्यंत कांदा लागवड झाली आहे. तर सरासरी क्षेत्र हे दोन लाख 21 हजार 335.55 हेक्टर आहे. त्यानुसार जवळपास 1 लाख 12 हजार 140.55 हेक्टरची घट निर्माण झाली आहे. मात्र यंदा हंगाम लांबला असल्याने उर्वरित लागवड पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सव्वा लाख हेक्टरने घट नाशिक विभागात रब्बी कांदा लागवडीचे दोन लाख 21 हजार 335 हेक्टर इतके सरासरी क्षेत्र आहे. यंदा मात्र प्रत्यक्षात 99 हजार 195 हेक्टर क्षेत्रावरच रब्बी हंगामातील कांदा लागवड झाली आहे. अजूनही एक लाख 22 हजार 141 हेक्टरवरील कांदा लागवड प्रलंबित आहे. ही कांदा लागवड अजून सुरू असल्याने लागवड क्षेत्रात अजून वाढ होऊ शकणार आहे. सर्वाधिक घट नाशिक जिल्ह्यात झाली आहे. नाशिक जिल्ह्यात रब्बी कांद्याचे एक लाख 93 हजार 174 हेक्टर इतके सरासरी क्षेत्र असून, प्रत्यक्षात 88 हजार 684 हेक्टरवरील कांदा लागवड पूर्ण झाली आहे.

परतीच्या पावसामुळे कांद्याची रोपे वाया गेली. कांद्याची रोपे नव्याने तयार करण्याची वेळ आल्याने रब्बी कांदा लागवडीचा हंगाम एक महिन्याच्या कालावधीने लांबला. शिवाय कांदा बियाणे संपल्याने शेतकऱ्यांना कांदा बियाणे खरेदी करावे लागले. कांदा बियाण्यांचीही टंचाई निर्माण होऊन दर दुप्पट झाले. कांदा रोपे उशिराने तयार झाल्याने लागवडीखालील क्षेत्रात घट आल्याचे दिसत असले, तरी रोपांच्या उपलब्धतेनुसार कांदा लागवडीत वाढ होईल. - भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना 

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रलागवड, मशागतपेरणीनाशिक