Agriculture News : धुळे जिल्ह्यातील (Dhule District) साक्री तालुका कृषी क्षेत्रात आघाडीवर असला तरी, येथील शेतकऱ्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार शेती असून, हीच शेती विकासाचा केंद्रबिंदू ठरली आहे.
मात्र, योग्य पाणी व्यवस्थापन, कृषीपूरक उद्योगांचा अभाव आणि बाजारपेठेची मर्यादा यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या साक्रीमध्ये सिंचनाचे योग्य नियोजन झाल्यास विकासाला गती मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
पाण्याचे दुर्भिक्ष आणि पीक बदलाचे आव्हान
पूर्वी पांझरा नदीच्या खो-यातील फड बागायत पद्धतीमुळे मोठ्या प्रमाणात शेती ओलिताखाली येत होती. मात्र, आता ही पद्धत कालबाह्रा झाली असून, अनेक गावांमध्ये 'पाटस्थळ' केवळ नावालाच उरले आहे. एकेकाळी द्राक्ष उत्पादनात आघाडीवर असलेला हा तालुका बदलत्या हवामानामुळे मागे पडला.
त्यानंतर डाळिंबाने शेतकऱ्याला नवी दिशा दिली, पण डाळिंबावरील रोगांनी शेतकरी पुन्हा हताश झाला. कांद्याला बाजारपेठ असूनही योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येते. यामुळे नगदी पिकांवरही अवलंबून राहणे शेतकऱ्यासाठी कठीण झाले आहे.
युवा शेतकऱ्यांना प्रोत्साहन आणि उद्योग-व्यापाराची गरज
तालुक्यातील अनेक तरुण शेती आणि शेतीपूरक व्यवसायांकडे वळत आहेत, ही एक सकारात्मक बाब आहे. परंतु, कृषी विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या प्रशिक्षण, शेती शाळा किंवा अभ्यास दौऱ्यांमध्ये युवकांचा सहभाग अजूनही अपुरा आहे. यामुळे कृषी माल प्रक्रिया उद्योगांना चालना मिळू शकलेली नाही. यासाठी व्यापक जनजागृतीची आवश्यकता आहे.
- विद्यानंद पाटील, साक्री