- बाळकृष्ण पुरोहित
अहिल्यानगर : नेवासा तालुक्यातील उसाचे आगार असणाऱ्या क्षेत्रात रब्बी हंगामात कांदा लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. डिसेंबर-२०२५ अखेर ८ हजार ५०७ हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली असून, आणखी दोन महिने शेतकरी कांदा लागवड करणार आहेत. मागील वर्षी २३ हजार २१७ हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड शेतकऱ्यांनी केली होती.
ऊस तुटून गेल्यानंतर शेतकरी गहू किंवा कांद्याचे पीक घेतात. यावेळी लागवड केलेला गावरान कांदा टिकावू असतो. त्यामुळे तो साठवून ठेवता येतो. चांगला भाव मिळाल्यानंतर शेतकरी कांदा विक्री करतात. मागील वर्षापेक्षा यावेळी कांदा पिकाच्या उत्पादनात शेतकऱ्यांना कमी आर्थिक उत्पन्न मिळाले, तर यावेळी चांगले उत्पन्न मिळेल, अशी कांदा उत्पादकांना अपेक्षा आहे.
एक एकर कांदा पिकास लागवडपूर्व मशागत ५ हजार रुपये, कांदा रोप १३ ते १५ हजार रुपये, कांदा लागवड १२ ते १४ हजार रुपये, दोन डोस १६ हजार रुपये, तणनाशक फवारणी दीड हजार रुपये, बुरशीनाशक १० हजार रुपये, कांदा काढणी १३ हजार रुपये, असा सरासरी ५५ ते ६५ हजार रुपये खर्च येतो. २ हजार रुपये क्विंटल भाव मिळाला, तरच कांदा शेती परवडते.
ऊस तुटून गेल्यानंतर दोन एकरांवर कांद्याची लागवड केली. कांदा रोपे घरीच तयार केली होती. मध्यंतरी अवकाळी झाल्याने कांदा रोपाला फटका बसला. आम्ही टाकलेल्या चार फडकी कांदा रोपात फक्त दोन एकराची कांदा लागवड झाली. नेहमी एका फडकीत एक एकर कांदा लागवड होते. कांद्याला २० रुपये किलो भाव मिळाला, तर परवडतो.
- प्रवीण कोठुळे, कांदा उत्पादक, खाटकवाडी, नेवासा
तीन एकर क्षेत्रावर ऊस पिकात कांदा लागवड केली आहे. आधुनिक पद्धतीने शेती परवडते. कांदा बाजारात दलालांचे प्राबल्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होतात. तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कृतीतून शेती करून इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे.
- जगन्नाथ कोरडे, शेतकरी नेते, प्रवरा संगम
