Agriculture News : तेलंगणा राज्याच्या धर्तीवर शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावाने थेट गावपातळीवर खरेदी करावी, अशी मागणी किनवट तालुक्यातील विविध शेतकरी संघटनांनी केली आहे. ((Shetmal Hamibhav)
आदिवासी व अतिदुर्गम भागात खासगी व्यापाऱ्यांकडून होत असलेली शेतकऱ्यांची लूट तात्काळ थांबवावी, अन्यथा १७ नोव्हेंबर रोजी किनवट येथील उपविभागीय कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनांनी दिला आहे.(Shetmal Hamibhav)
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सोयाबीन, तूर, हरभरा, गहू, कापूस, मका आदी शेतमालाची तेलंगणा राज्याच्या धर्तीवर गावपातळीवर शासनाने खरेदी करावी, अशी मागणी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना, प्रहार जनशक्ती पक्ष, अखिल भारतीय किसान सभा आणि शेतकरी आघाडी यांच्या वतीने केली आहे. (Shetmal Hamibhav)
शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे अधिक पडावेत
अतिवृष्टी आणि उत्पादन खर्चवाढ यामुळे आधीच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी गावपातळीवर शेतमाल खरेदी सुरू करावी, अशी मागणी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना, प्रहार जनशक्ती पक्ष, अखिल भारतीय किसान सभा आणि शेतकरी आघाडी यांच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात सहायक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
तेलंगणा राज्यात गावपातळीवर खरेदीची व्यवस्था असल्याने शेतकऱ्यांना कोणताही अतिरिक्त खर्च लागत नाही.
महाराष्ट्रातही अशीच यंत्रणा लागू केल्यास शेतकऱ्यांना स्थिर हमीभाव मिळेल आणि खासगी खरेदीपोटी होणारी लूट थांबेल.
खरेदी केंद्रांवरील खर्च आणि शेतकऱ्यांचा छळ
सध्या शासनाच्या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना प्रति क्विंटल जवळपास २०० रुपये अतिरिक्त खर्च करावा लागतो. बारदाना ६० रुपये, वाहतूक ५० रुपये, हमाली ५० रुपये आणि इतर खर्चामुळे शेतकऱ्यांचा तोटा वाढतो. त्यातच खरेदी केंद्रांवरील विलंब, व्यवहारातील अडचणी आणि छळवणुकीमुळे शेतकरी त्रस्त आहेत.
आदिवासी भागातील आर्थिक संकट
किनवट तालुका आदिवासी व अतिदुर्गम भागात मोडतो. येथे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अत्यंत कमकुवत असून, बाजारभावातील चढ-उतारांमुळे त्यांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
स्थानिक संघटनांचे मत आहे की, शासनाने नावीन्यपूर्ण योजना आखून गावपातळीवरील थेट खरेदी सुरू केल्यास शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल, आत्महत्यांचे प्रमाण घटेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल.
१७ नोव्हेंबरला रास्ता रोको आंदोलन
गावपातळीवर खरेदी सुरू करण्याची मागणी तातडीने मान्य न झाल्यास १७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता किनवट उपविभागीय कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर शेतकरी संघटनेचे रमेश कदम, प्रहार जनशक्ती पक्षाचे सतीश बोन्तावार, अखिल भारतीय किसान सभेचे अडेल्लू बोनगीर, तसेच गजानन चव्हाण, पंढरीनाथ वाघमारे, प्रकाश जमादार, दादाराव डोंगरे, हरी वाकळे, राजू जमादार, अविनाश पवार, ज्योतिबा डोंगरे, विक्रांत इजारे, रमेश परतवाघ, रामराव जमादार, उत्तम डोंगरे, विजय वाळके, तुकाराम मुरमुरे, ज्ञानेश्वर आगलावे, संतोष आनकाडे, गजानन थोरात आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शासनाने तेलंगणाच्या धर्तीवर गावपातळीवर शेतमाल खरेदी सुरू केली, तर शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल आणि खासगी व्यापाऱ्यांच्या लुटीला आळा बसेल.
