नाशिक : काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यात गोळ्या किंवा पावडरचा गॅस तयार होऊन विषबाधा झाल्याने दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कारण अनेकदा आपल्या घरात गहू, तांदूळ, कडधान्यांना भुंगा, सोंड वा इतर कीड लागू नये म्हणून रासायनिक कीटकनाशकांच्या गोळ्या, बोरिक पावडर वापरली जाते. मात्र, ज्यापासून अन्नधान्यास विषबाधा होणार नाही, अशीच औषधे सल्ला घेऊन वापरणे आवश्यक असल्याचे कृषी विषयातील तज्ज्ञांनी सांगितले.
कीडनाशकांचा सर्रास होतो वापर
गव्हातील कीड रोखण्यासाठी कीडनाशकांचा वापर सर्रासपणे केला जातो. सेल्फॉस हे कीटकनाशक आहे. त्याचे संयुग नाव अॅल्युमिनियम फॉस्फाइड आहे. ते पोटातील हायड्रोक्लोरिक आम्लाशी प्रक्रियेने फॉस्फिन वायू तयार करते, जो रक्तात फिरतो आणि मायटोकॉन्ड्रियाच्या इलेक्ट्रॉन वाहतूक प्रणालीला अर्धांगवायू करू शकतो.
म्हणून पारंपरिक आणि नैसर्गिक उपाय करा
धान्यामध्ये काही कडुनिंबाची पाने टाकल्यास धान्याला कीड लागत नाही.
डब्यांमध्ये धान्याच्या थरांमध्ये लसणाची गड्डी ठेवल्याने धान्याला कीड लागत नाही.
लवंगचा उग्र वास कीटकांना धान्याजवळ येऊ देत नाही.
धान्यावर चुन्याची निवळी आणि खड़े मीठ यांचे थर रचल्याने कीटक, मुंग्यांपासून संरक्षण मिळते.
धान्यात कीडनाशक टाकताना काय काळजी घ्याल?
धान्यामध्ये कीडनाशक वापरताना, संपूर्ण शरीर झाकणारे कपडे, हातमोजे, चष्मा, टोपी आणि मास्क वापरावे. फवारणी करताना तंबाखू किंवा धूम्रपान टाळावे आणि खाण्या-पिण्याच्या वस्तू दूर ठेवाव्यात. फवारणी करताना विषबाधा टाळण्यासाठी योग्य पंप वापरावा आणि फवारणीनंतर हात साबणाने स्वच्छ धुवावे.
धान्याला कीड लागू नये, यासाठी रासायनिक कीटकनाशकांच्या गोळ्या धान्यात मिसळणे टाळावे. त्याऐवजी लिंबाचा पाला वगैरे पांरपरिक युक्त्या कराव्या. वर्षभराचे धान्य घेतल्यावर त्याला उन्हाळ्यात किंवा ऑक्टोबर हिटमध्ये ऊन दाखवावे. दमट जागेत धान्य ठेवू नये. पाण्यापासून वाचवावे. त्यामुळे कीड टाळता येते.
- जगदीश पाटील, निवृत्त कृषी उपसंचालक