नाशिक : इच्छा मनी असेल तर शेतीत नवनवीन प्रयोग करून इतर शेतकऱ्यांसाठी रोल मॉडेल ठरता येते. नाशिक तालुक्यातील (Nashik Taluka) एकलहरे येथील गोरखनाथ पोपटराव राजोळे (४१) व धोंडेगाव येथील त्र्यंबक सुका बैंडकुळे (७४) यांनी कमी जागेत गव्हाचे पीक (Wheat Farming) घेत भरघोस उत्पन्न मिळवत पुरस्काराला गवसनी घातली.
रासायनिक खतांचा कमीतकमी वापर त्यांनी केला. कृषी विभागाने २०२३ मधील रब्बी हंगामात घेतलेल्या राज्यस्तरीय पीक स्पर्धेचा निकाल जाहीर केला. स्पर्धेत या दोघा शेतकऱ्यांनी अनुक्रमे सर्वसाधारण व आदिवासी गटात राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पटकाविला. नाशिक जिल्हा कांदा, द्राक्ष अन् भात शेतीच्या माध्यमातून समृद्ध आहे.
मात्र त्यातील ३० ते ४० टक्के शेतकरी आता गहू, उस अन् मका पिकाकडे वळत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. त्याचेच फलीत नाशिक जिल्ह्यात दोन राज्यस्तरीय पुरस्कार पीक स्पर्धेच्या माध्यमातून पदरी पडले. शासनातर्फे लवकरच पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथे होणार आहे.
निरनिराळे पीक घेण्याचा प्रयोग यशस्वी
गहू पिकातील आदिवासी गटात धोंडेगाव येथील त्रंबक सुका बेंडकोळी यांनीही राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळविला. वय ७४ झाले म्हणून काय झाले शेतीतला हाच दांडगा अनुभव बेंडकोळी हे वेगवेगळे पीक घेऊन आर्थिक स्त्रोत वाढीसाठी कामी आणतात. त्यांनी समृद्ध शेतीतला हाच धडा मुलांनाही दिला आहे. त्यांची पाच एकर बागायत शेती. एक हेक्टरमध्ये त्यांनी मागील वर्षी गव्हाचे पीक घेतले. ५५ क्विंटल गहू त्यांनी काढला.
- त्र्यंबक बैंडकोळी, शेतकरी
दिवसा नोकरी, रात्री शेतीकाम
एकलहरे येथील गोरखनाथ राजोळे हे तरूण शेतकरी खासगी कंपनीत काम करतात. दुपारी तीन वाजेपर्यंत नोकरी अन् त्यानंतर शेतीसाठी वेळ देऊन त्यांनी आपले पाच एकर शेतशिवार फुलविले आहे. दुपारी लोडशेडींग असल्याने पुन्हा रात्रीचा दिवस करून त्यांनी किरकिट अंधारात शेतीसाठी पाणी देण्याचा क्रम सुरू ठेवला.
एक एकरमध्ये त्यांनी मागील वर्षी रब्बी हंगामात गव्हाचे पीक घेतले. बाकीच्या जागेत कांदा व ऊस पीक घेतले. एक हेक्टरी २६ क्विंटल लोकवण गहू त्यांनी काढला. चार महिन्यात साधारण ८० ते ९० हजाराचे उत्पन्न त्यांनी मिळविले. याच जागेत त्यांनी नंतर कांदा पिक घेतले. शेतीत केलेले नवनवीन प्रयोग तसेच कमी जागेत अधिक उत्पन्न घेत त्यांनी हा पुरस्कार मिळविला. - गोरखनाथ राजोळे, शेतकरी, एकलहरे