नाशिक : पावसाळ्यात ज्याप्रमाणे आपल्या अवतीभवती विविध प्रकारच्या रानभाज्या (Ranbhaji) असतात. त्या आपण चवीने खात असतो. उन्हाळ्यातही रानभाज्या (Summer ranbhaji) उपलब्ध असतात; परंतु याबाबत माहिती नसल्याने बरेच जण त्या खात नाहीत. उन्हाळ्यात रानभाज्यांची पाने, फुले व फळेसुद्धा खाल्ली जातात. उन्हाळ्यात या रानभाज्या विविध भागांत मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. परंतू या भाज्या बाजारात विक्रीसाठी येत नसल्याने त्या रानातून शोधून आणाव्या लागतात.
चैत्राचे आगमन झाले की निसर्गात अनेक रंगीबेरंगी फुले फुलायला सुरुवात होते. करंज, करवंद, कुडा यांच्यासोबत आणखी एक झाड संपूर्ण फुलांनी बहरते; ते झाड म्हणजे ‘बहावा’. हा १०० टक्के भारतीय कुळातील असून भारताच्या विविध भागात आढळते. पिवळ्या धमक फुलांच्या पाकळ्यांनी भरलेले बहाव्याकडे (Fistula) पाहणे म्हणजे नेत्रसुखच. याच बहाव्याच्या फुलांची भाजी देखील बनवली जाते.
उन्हाळ्यात विविध रानभाज्या पाहायला मिळतात. त्यात करवंद, बहावा, भोकर इत्यादींसह आंब्याचा कोवळा मोहरही खाल्ला जातो. शरीरासाठी हे पौष्टिक आहे. जिल्ह्यात अनेक रानभाज्या उन्हाळ्यातही उपलब्ध आहेत. त्या योग्य प्रकारे ओळखून मग त्यांची तोड करून खाल्ले पाहिजे.
- आरती देशमुख, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार
अशी बनवा भाजी
साहित्य
- बहाव्याची फुले
- कांदे - २ मध्यम आकाराचे
- लसूण - ४-५ पाकळ्या
- हिरव्या मिरच्या - २ (तुकडे करून)
- मोहरी - १ लहान चमचा
- हिंग - पाव चमचा
- हळद - १ लहान चमचा
- लाल तिखट - १ लहान चमचा
- मीठ - चवीनुसार
- बेसन- २ चमचे...
प्रत्यक्ष कृती
- बहाव्याच्या फुलांच्या पाकळ्या वेगळ्या करून २ पाण्यातून धुवून घ्या व निथळत ठेवा.
- कांदा उभा चिरून घ्या. (जितका कांदा जास्त तितकी चव छान येते.)
- यावेळी लसूण ठेचून घ्या.
- कढईत तेल गरम करून हिंग-मोहरीची फोडणी करा .
- त्यात ठेचलेला लसूण घालून खरपूस होऊ द्या.
- आता कांदा घालून गुलाबीसर होऊ द्या. हळद, लाल तिखट घाला.
- त्यात बहाव्याच्या पाकळ्या घालून परतून घ्या. आवश्येतनुसार मीठ घाला.
- २ चमचे बेसन लावून झाकण ठेवा आणि ५ मिनिटे दणदणीत वाफेवर शिजवून घ्या.