वर्धा : सततचा दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक संकटांचा सामना करत तब्बल ८ वर्षांपासून विविध प्रकारची रोपे तयार केली. वर्धा जिल्ह्यातील (Wardha District) वायगांव (नि.) येथील व्यंकटेश बालाजी भगवान देवस्थानाच्या १४ एकर शेतात विविध प्रजातींची तब्बल चार हजार झाडे लावून ऑक्सिजन पार्क (Oxygen Park) उभारण्यात आला आहे. स्थानिक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेंतर्गत हे काम करण्यात येत आहे.
वर्धा शहरापासून १० किलोमीटर अंतरावर असलेले २,४०० लोकसंख्या असलेले वायगाव, शेतीवर आधारलेली येथील संपूर्ण दिनचर्या. मात्र, पावसाच्या लहरीपणामुळे शेती (Farming) बेभरवशाची झालेली आहे. यामुळे अमाप खर्च करूनसुद्धा अपेक्षित शेती उत्पादन होत नसल्याचे येथील गावकऱ्यांचे म्हणणे आहे. यावर पर्याय शोधत चंद्रकांत ठक्कर यांनी २०१७ मध्ये १४ एकरमध्ये ऑक्सिजन पार्क तयार करण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतीला सादर केला व यास मंजुरी मिळाली.
त्यानंतर प्रत्यक्ष रोपे लावण्याचे काम सुरू झाले ते आतापर्यंत कायम आहे. चार वर्षे दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई भासली. विहिरीतील पाणी आटत चालल्याने रोपांसाठी ठिंबक सिंचन सुविधा नसली तरी झाड़े जगविण्याची धडपड असल्याने सर्व झाडे जगवली. यामुळे कमी पाण्यावरही रोपे जगवण्यास मदत झाली.
विविध प्रजातींची बहारदार झाडे
ऑक्सिजन पार्कमध्ये फणस, सीताफळ, आंबा व आंब्याचे विविध प्रकार, चिंच, निबू, पेरू व पेरूतील विविध प्रकार, मोसंबी, संत्रा, चिकू, बदाम, आवळा व विविध प्रकारची झाडे बहरली आहेत.ऑक्सिजन पार्क यशस्वी झाल्याने विविध अधिकारी या ऑक्सिजन पार्कला भेट देतात. या ऑक्सिजन पार्कला शासनाने निधी दिल्यास चांगली देवराई तयार होऊ शकते, असा विश्वास येथील गावकऱ्यांनी व्यक्त केला.
सध्याच्या घडीला वातावरण बदलाचा फटका शेतकऱ्यांसह इतरांना बसतो आहे. म्हणूनच लावलेलं प्रत्येक झाड जगवणे महत्वाचे आहे. जेणेकरून इथली जैविविधता टिकून राहील, त्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. जवळपास चौदा एकरावरील झाडांचे संरक्षणासाठी झटतो आहे, यातून आनंद मिळतो. यातून खूप काही शिकता येते. आधुनिक तंत्रज्ञान वापरून ऑक्सिजन पार्क पर्यटनस्थळ तयार करायचे आहे.
- चंद्रकांत ठक्कर, अध्यक्ष, बालाजी भगवान देवस्थान, वायगांव (नि.).