जळगाव : खतांचा पुरेसा साठा (Fertilizer stock) उपलब्ध असताना विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. लिंकिंगसह अवाजवी दराने खतांची विक्री करीत शेतकऱ्यांची लूटही सुरू आहे. त्यावर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने इलाज शोधून काढला आहे.
आता मोबाईल लिंकवर 'क्लिक' करताच संबंधित तालुक्यातील विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेल्या खत साठ्याची माहिती दिसणार आहे. त्यामुळे साठा उपलब्ध नाही, असे सांगणाऱ्या विक्रेत्यांवर 'बाप दाखव, नाही तर श्राद्ध कर' असाच प्रसंग ओढवणार आहे.
जि.प.च्या कृषी विभागाने अमळनेर तालुक्यात (Amalner Taluka) कृषी केंद्रावर डमी ग्राहक पाठवून पडताळणी केली. तेव्हा साठा उपलब्ध असतानाही संबंधित विक्रेत्याने नकार दिल्यानंतर सुरु असलेल्या खतांच्या काळ्याबाजारावर शिक्कामोर्तब झाले. म्हणून या कृषी विभागाने आता दैनंदिन खतांच्या साठ्याची तालुकानिहाय माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी, यासाठी एक मोबाईल लिंक विकसित केली आहे.
काय करावं लागणार?
शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या https://adozpjalgaonfertilizer.blogspot.com/p/ac -zp-fertilizer-stock-jalgaon.html या लिंकवर जावे लागेल. त्याठिकाणी तालुक्याची निवड केल्यानंतर कृषी केंद्रांवर उपलब्ध असलेल्या खतांच्या साठ्याविषयी माहिती उपलब्ध होणार आहे.
शेतकऱ्यांनी लिंकवर जाऊन साठ्याची माहिती घ्यावी. त्यानंतर गरजेनुसार खतांची खरेदी करावी. साठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट होत असतानाही विक्रेत्याने नकार दिल्यास तत्काळ तक्रार करावी.
- पद्मनाभ म्हस्के, जिल्हा कृषी विकास अधिकारी, जि. प.