Agriculture News : राज्यात सध्या उन्हाचा कडाका वाढत असून तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. याच पार्श्वभूमीवर शेतशिवारात आगीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे.(Agriculture News)
रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि ज्वारी ही पिके काढणीच्या टप्प्यावर असताना अशा आगीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे.(Agriculture News)
सध्या अनेक भागात गव्हाची काढणी मोठ्या प्रमाणावर बाकी आहे. वाढत्या तापमानामुळे विजेचा वापर वाढल्याने रोहित्रांवर (ट्रान्सफॉर्मर) ताण येत आहे. त्यामुळे शॉर्टसर्किट किंवा रोहित्र पेट घेण्याच्या घटना घडण्याची शक्यता वाढली आहे.
याशिवाय काही ठिकाणी शेतकरी पुढील हंगामासाठी तयारी करताना बांधावर काडीकचरा जाळत आहेत. मात्र, या आगीच्या ठिणग्या उडून शेजारच्या पिकांमध्ये आग लागण्याचा धोका निर्माण होत आहे.
आठवडाभरात चार आगीच्या घटना
वाशिम जिल्ह्यात गेल्या आठवड्यात आगीच्या किमान चार घटना घडल्या आहेत. यामध्ये गव्हाच्या पिकासह शेतीसाठी लागणारे साहित्य जळून खाक झाले आहे.
कारंजा तालुक्यात दोन घटना
मंगरुळपीर व मानोरा तालुक्यात प्रत्येकी एक घटना
रिसोड तालुक्यातील एका घटनेत वेळीच नियंत्रण मिळाल्याने मोठे नुकसान टळले
कारंजा तालुक्यातील हिंगणवाडी परिसरात गव्हाच्या पिकाला लागलेली आग ही शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा ठरली आहे.
गव्हाच्या लागवड क्षेत्रात वाढ
जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत गव्हाच्या लागवडीचे क्षेत्र सातत्याने वाढत आहे. यंदा गव्हाच्या क्षेत्रात सुमारे ८,१०७ हेक्टरने वाढ झाली असून एकूण ४७,०८९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. त्यामुळे आगीच्या घटनांमुळे होणारे संभाव्य नुकसानही अधिक गंभीर ठरत आहे.
शेतकऱ्यांनी घ्यावयाची खबरदारी
शेतातील आग टाळण्यासाठी खालील उपाय तातडीने अमलात आणणे आवश्यक आहे.
* शेतात किंवा बांधावर सुकलेले गवत व काडीकचरा साचू देऊ नये
* पिके उभी असताना कचरा जाळणे टाळावे
* उच्चदाब वीजवाहिन्यांच्या खाली कापणी केलेले पीक किंवा गवत ठेवू नये
* शॉर्टसर्किट किंवा विजेचा धोका जाणवल्यास त्वरित महावितरण, महसूल प्रशासन व पोलिसांना माहिती द्यावी
रोहित्राजवळ विशेष दक्षता
* शेतात रोहित्र असल्यास त्याखाली कचरा साचू देऊ नये
* किमान १० चौरस फूट परिसर स्वच्छ ठेवावा
* झुडपे, सुकलेले गवत नियमित काढून टाकावे
यामुळे रोहित्र पेटल्यास किंवा शॉर्टसर्किट झाल्यास पिकाला आग लागण्याचा धोका कमी होतो.
सध्या काढणीच्या टप्प्यावर असलेले पीक म्हणजे शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या कष्टाचे फळ आहे. मात्र, वाढते तापमान आणि मानवी दुर्लक्ष यामुळे हे पीक काही क्षणांत राख होण्याचा धोका आहे.
त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने जागरूक राहून योग्य ती खबरदारी घेतल्यास मोठे आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते.
हे ही वाचा सविस्तर :Wheat Management : गव्हाचे काड जाळताय? थांबा! 'हा' उपाय न केल्यास जमिन होईल उजाड
