Biochar Production : शेतातील कापूस वेचणीनंतर शिल्लक राहिलेल्या पन्हाटी आळण्याऐवजी किंवा फेकून देण्याऐवजी त्यापासून बायोचर खतनिर्मितीचा (Biochar Fertilizer) यशस्वी प्रयोग शेतकऱ्याने केला आहे. यवतमाळ तालुक्यातील (Yavatmal) वाई (रुई) येथे नीलेश मुधाने या तरुणाने हा प्रकल्प सुरू केला आहे. जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग ठरला आहे.
अकोला बाजार-मंगरूळ मार्गावर वाई येथील मुधाने यांचे शेतात बायोचर खताची निर्मिती सुरू झाली आहे. येथे शेतातून तोडलेल्या पऱ्हाटीचा ओलावा वधून ज्वलन केले जाते. प्रदूषण (Air Pollution) होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. काही प्रमाणात ज्वलन प्रक्रिया करून आग पाण्याने विझविली जाते. यावर आणखी प्रक्रिया करून बायोचर खत तयार करण्यात येते. याकरिता पऱ्हाटी द्या व मोफत बायोचर खत घेऊन आ, असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
शेतकऱ्याने पऱ्हाटी तोडल्यानंतर मोळी बांधण्यासाठी दोरी पुरविली जाते. पऱ्हाटी ट्रॅक्टरने प्रकल्पात आणून त्यावर प्रक्रिया करून खताची निर्मिती होत आहे. बळीराजा सेवा केंद्र शेतकरी उत्पादक कंपनीने हा प्रकल्प सुरू केला आहे. शेतात रासायनिक खत वापरल्याने सेंद्रिय कार्बनचे प्रमाण कमी झाले आहे. बायोचर खताचा शेतकऱ्यांनी वापर केल्यास सेंद्रिय कार्बन वाढण्यास व जमीन सुपीक होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च कमी होऊन त्यात वाढ होणार आहे.
शेतकऱ्यांना मिळणार मोफत खत
बायोचर खत जमिनीत पोषक पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढविते. जमिनीतील कार्बनचे तत्त्वाची भर घालते. जमिनीची प्रमाण वाढते. मातीची रचना सुधारते. कृषी प्रदूषण कमी होण्यास मदत होते. जमिनीतील विषारी द्रव्ये कमी होते. हे खत शेतकऱ्यांना मोफत दिले जाणार आहे.