Agriculture News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जाच्या वसुलीस स्थगिती दिल्याने नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्यांची कर्ज वसुली करू नये, अशा आशयाचे निवेदन शेतकरी समन्वय समितीने नाशिक जिल्हा बँकेचे प्रशासक संतोष बिडवे यांना दिले आहे.
एकीकडे मराठवाड्यातील शेतकरी उध्वस्त झाला आहे. पुराने होत्याचे नव्हते केले आहे. त्यामुळे शासनाकडून मदत केली जात आहे. यावर बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अतिवृष्टीत ६० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून २ हजार २१५ कोटी रुपये वितरित करण्यास सुरवात झाली आहे. ज्या ज्या प्रकारचे नुकसान झाले आहे, त्या नुकसानीचा अहवाल तयार करून मदत केली जाईल, असेही सांगितले.
पुढे ते म्हणाले की, बँकाकडून बाधित शेतकऱ्यांना नोटिसा दिलेल्या आहेत, त्या जुन्या नोटिसा आहेत. त्या आमच्या निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे बँकांना अतिशय सक्त निर्देश दिलेले आहेत. कुठेही वसुली करू देणार नाही, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकरी समन्वय समितीच्या माध्यमातून विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे, प्रशासक संतोष बिडवे यांना निवेदन देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी शेती कर्जाची कोणती वसुली करू नये.
ज्या बँका वसुली करतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्या अनुषंगाने कोणतीही कर्ज वसुली व कुठल्याही शेतकऱ्यावर नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने कोणतीही कारवाई करू नये, असे निवेदनात म्हटले आहे.