Agriculture News : खरीप हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खतांसाठी होणाऱ्या धावपळीला यंदा ब्रेक बसणार आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागाने 'कृषिक' हे मोबाइल ॲप (Mobile App) तयार करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना घरबसल्या खत साठ्याची माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या ॲपमुळे खताच्या काळाबाजारावर आळा बसणार असून शेतकऱ्यांना पारदर्शक सेवा मिळणार आहे.
पेरणीचा हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना दरवर्षी खतासाठीची होत असलेली धावपळ यंदा थांबणार आहे. (Mobile App)
राज्य शासनाच्या कृषी विभाग व बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने 'कृषिक' हे नवे मोबाइल ॲप (Mobile App) विकसित करण्यात आले असून, त्याद्वारे शेतकऱ्यांना घरबसल्या खतसाठ्याची अचूक माहिती मिळणार आहे.
खते व बियाण्यांची कृत्रिम टंचाई दाखवून शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी कृषी विभागाने केली आहे.
कृषिक ॲपमध्ये खत विक्रेत्यांची यादी, त्यांचे मोबाइल क्रमांक आणि त्यांच्या दुकानातील साठ्याची माहिती नियमितपणे अपडेट केली जाणार आहे. त्यामुळे दुकानात खत असूनही नाकारले गेले, तर संबंधित विक्रेत्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी अतुल वायसे यांनी दिली. (Mobile App)
सध्या हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, हिंगोली, वसमत आणि कळमनुरी तालुक्यातील दुकानदारांची माहिती अॅपवर उपलब्ध आहे, तर औंढा नागनाथ तालुक्याची माहिती लवकरच अपडेट होणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ८१ हजार ५६९ मेट्रिक टन खताचा वापर केला जातो. यात युरिया, डीएपी, एमओपी, एनपीके, एसएसपी यांचा समावेश आहे. यंदा ३ लाख ५४ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे अचूक व पारदर्शक खतवाटप अत्यंत गरजेचे ठरत आहे.
'कृषिक' ॲपची वैशिष्ट्ये
* खताचा साठा, प्रकार व उपलब्धता
* पिकांनुसार खताची मात्रा व वापर पद्धती
* बाजारभाव, कृषी योजना व प्रशिक्षणाची माहिती
* घरबसल्या शेतकऱ्यांसाठी आवश्यक माहिती
असे करा ॲप डाऊनलोड
* मोबाईलवरील Play Store मध्ये 'कृषिक' टाइप करून ॲप डाऊनलोड करा.
* आवश्यक परवानग्या द्या व ॲप सुरू करा.
* 'चावडी' पर्यायावर क्लिक करा.
* 'खत उपलब्ध' या पर्यायात आपला जिल्हा व तालुका निवडा.
* खत विक्रेत्यांची यादी व साठा पाहा.
'कृषिक' ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पारदर्शक व सुलभ सेवा उपलब्ध होणार असून खताच्या काळाबाजाराला आळा बसेल, अशी अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे.