Agriculture Awards : कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्पन्नवाढ आणि इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे कार्य करणाऱ्या शेतकरी व संस्थांसाठी कृषी विभागाकडून लाखो रुपयांचे मानाचे पुरस्कार देण्यात येणार आहेत.(Agriculture Awards)
सन २०२५ साठी विविध कृषी पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले असून, इच्छुकांनी ३१ जानेवारीपर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.(Agriculture Awards)
कृषी विभागामार्फत शेती, फळबाग, कृषी संलग्न व्यवसाय तसेच कृषी प्रसार व संघटनात्मक कार्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती, गट व संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे. या पुरस्कारांमुळे प्रगतशील शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहनासोबतच सामाजिक सन्मान मिळणार असून, इतर शेतकऱ्यांनाही नव्या प्रयोगांसाठी प्रेरणा मिळणार आहे.
हे पुरस्कार दिले जाणार
डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार (रोख ३ लाख रुपये), वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, कृषिभूषण सेंद्रिय पुरस्कार (रोख २ लाख रुपये), शेतीमित्र पुरस्कार (रोख १.२० लाख रुपये), उद्यान पंडित पुरस्कार (रोख १ लाख रुपये), वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार (सर्वसाधारण व आदिवासी गट – ४४ हजार रुपये), तसेच युवा शेतकरी पुरस्कार (वयोमर्यादा कमाल ४० वर्षे – १.२० लाख रुपये) देण्यात येणार आहेत. सर्व पुरस्कारांमध्ये रोख रक्कमेसह स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व सपत्नीक सत्काराचा समावेश राहणार आहे.
पात्रतेसाठी अटी काय?
पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याच्या स्वतः च्या नावावर शेती असणे आवश्यक असून, शेती हा कुटुंबाचा मुख्य व्यवसाय असावा. कृषी क्षेत्रात अति उल्लेखनीय कार्य, अधिक नफा, शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे कार्य केलेले असावे. कृषी पदवी, पदविका किंवा पदव्युत्तर शिक्षण असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
प्रस्ताव सादरीकरणाची प्रक्रिया
इच्छुक शेतकरी, संस्था व गटांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ३१ जानेवारीपर्यंत सादर करावेत. प्रस्तावांची छाननी करून गुणवत्तेनुसार पुरस्कारार्थींची निवड करण्यात येणार आहे.
कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण आणि प्रेरणादायी कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी या पुरस्कार प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
