Agricultural News : अतिवृष्टी आणि दुष्काळात उद्ध्वस्त झालेल्या पिकांचे नुकसान भरून न काढल्यामुळे अखेर ग्राहक मंचाने विमा कंपनीला दणका दिला.
हिंगोलीच्या शेतकऱ्याला १.८२ लाख रुपयांची नुकसानभरपाई ९ टक्के व्याजासह देण्याचे आदेश मंचाने बजावले. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टी व दुष्काळामुळे पिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यास टाळाटाळ करणाऱ्या विमा कंपनीला अखेर जिल्हा ग्राहक न्याय मंचाने दणका दिला आहे.
डिग्रस कहऱ्हाळे (ता. सेनगाव) येथील शेतकरी शिवाजीराव कन्हाळे यांना नुकसानभरपाई म्हणून १ लाख ८२ हजार २० रुपये रक्कम २१ ऑक्टोबर २०२० पासून प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत ९ टक्के व्याजासहदेण्याचा आदेश मंचाने बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला दिला आहे.
पण कंपनीकडून टाळाटाळ
कन्हाळे यांनी खरीप २०१९ मध्ये शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत मूग, उडीद, कापूस व सोयाबीन पिकांसाठी विमा उतरवला होता. मात्र ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या अवकाळी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनानेही या काळात अतिवृष्टी जाहीर केली होती.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये शासनाचे अधिकारी आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी स्थळ पाहणी करून नुकसानीचा अहवालही तयार केला होता. तरीदेखील विमा कंपनीने नुकसानभरपाई देण्यास नकार दिला. त्यामुळे कन्हाळे यांनी अॅड. बी. डी. टेकाळे यांच्यामार्फत ग्राहक मंचात दाद मागितली.
मंचाचा निर्णय आहे तरी काय?
या प्रकरणाची सुनावणी मंचाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र मराठे व सदस्य विष्णू धबडे यांच्या खंडपीठाने केली. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून कन्हाळे यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात आली.
मंचाने बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला आदेश दिला की,
* मूग, उडीद, कापूस व सोयाबीन पिकांची विमा संरक्षित रक्कम १,८२,०२० रुपये २१ ऑक्टोबर २०२० पासून प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत ९% वार्षिक व्याजासह तातडीने द्यावी.
* मानसिक त्रासाबद्दल ५ हजार रुपये व तक्रारीच्या खर्चासाठी ३ हजार रुपये वेगळे द्यावेत.
शेतकऱ्यांना दिलासा
अतिवृष्टी व दुष्काळात शेती उद्ध्वस्त झाल्यानंतरही विमा कंपनीने नुकसानभरपाई न दिल्यामुळे कन्हाळे यांना मानसिक व आर्थिक त्रास झाला होता. अखेर न्याय मिळाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.