गोंदिया : खरीप व रब्बी हंगामदरम्यान मोठ्या प्रमाणावर खताचा काळाबाजार केला जातो. याचा आर्थिक फटका मात्र शेतकऱ्यांना बसतो. या प्रकाराला पायबंद लावण्यासाठी आता कृषी आयुक्तांनी पत्र काढून कृषी केंद्रांना खताचा केला जाणारा पुरवठा आणि त्यांच्याकडील स्टॉक, विक्री याची पडताळणी आता कृषी सहायकांच्या माध्यमातून करण्याचे आदेश दिले आहे. यासंबंधीचे पत्र सर्व जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयांना दिले आहे.
आखाती देशातील युद्धामुळे खत पुरवठ्यावर सुद्धा परिणाम झाला होता. उन्हाळी धान पिकासाठी युरिया खताची मोठी मागणी असते; पण याच कालावधीत युरिया उपलब्ध होत नसल्याने शेतकरी अडचणीत आले होते. उन्हाळी धानाची रोवणी आटोपली असून, धानाच्या वाढीसाठी शेतकरी युरियाचा डोस देत असतात.
पण युद्धाचा खत पुरवठ्यावर परिणाम झाला होता. तर काही ठिकाणी अतिरिक्त दराने युरियाची विक्री केली जात असल्याची ओरड वाढली होती. मात्र, सद्यःस्थितीत युरियाचा पुरवठा झाल्याने ही अडचण दूर झाली आहे. जिल्ह्यात सध्या स्थितीत ६ हजार ५०० मेट्रिक टन युरियाचा साठा आहे. तर खरीप हंगामासाठी कृषी विभागाने २१ हजार मेट्रिक टन युरियाची मागणी केली आहे.
भरारी पथकात आता पं. स.च्या कृषी अधिकाऱ्यांचा समावेश
खरीप आणि रब्बी हंगामात खते, बियाणांचा काळाबाजार होऊ नये, यासाठी २ भरारी पथके गठीत करण्यात आली आहेत. ही भरारी पथके कृषी केंद्रांना भेटी देऊन तपासणी करणार आहेत. या भरारी पथकांत आता पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांचासुद्धा समावेश करण्यात आला आहे.
