गडचिरोली : उन्हाळ्यात वनक्षेत्रात वणव्यांचे (Forest Fire) प्रमाण वाढते. वनक्षेत्रात निष्काळजीपणे आग प्रज्वलित केल्यास, डोंगरालगत पेटती सिगारेट, बिडी फेकल्यास भडकलेली आग हजारो हेक्टर वनसंपदा खाक करू शकते. आग लावून वनसंपत्तीचे नुकसान केल्यास दंड आणि शिक्षाही होऊ शकते. अशाप्रकारे वणवे लावणाऱ्यांवर वन गुन्हा दाखल होऊन त्याला कोठडीची हवा खावी लागू शकते.
उन्हाळ्याला (Summer Season) सुरुवात झालेली आहे. जिल्हा पानझडी वनक्षेत्रात येत असल्याने पाने गळून पडण्यास सुरुवात झालेली आहे. अशातच काही दिवसांतच जिल्ह्यात मोहफूल संकलनाला सुरुवात होईल. मोहफूल संकलन करणारे नागरिक पालापाचोळा जाळतात. याशिवाय बिडी, सिगारेट ओढणारे व्यक्ती आगपेटीची पेटती काडी किंवा अर्धवट राहिलेली बिडी, सिगारेटा जंगलातच फेकून देतात. यामुळे जंगलात वणता पसरतो. त्यामुळे नागरिकांनी वणवे लावू नयेत. तसेच वणवे रोखण्यासाठी वनविभागाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
जंगलाला आग लागण्याची प्रमुख कारणे काय?मोहफूल संकलनासाठी आगी लावल्या जातात. याशिवाय तेंदू झाडाला अधिक फुटवे यावीत यासाठी काही तेंदू ठेकेदार जंगलाला आगी लावतात. याशिवाय जंगलालगतच्या शेतातील धुरे जाळण्यासाठीही अनेकजण आगी लावल्यानंतर ही आग जंगलात पसरते. त्यामुळे दुर्मीळ वनस्पती नष्ट होतात.
काय आहे जाळरेषा?एका ठिकाणी लागलेला वणवा जास्त ठिकाणी पसरत जाऊ नये म्हणून वनविभागामार्फत काही उपाययोजना केल्या जातात. त्यामध्ये लागलेला वणवा पसरू नये म्हणून वनविभागाकडून एका ठिकाणी आधीच आग लावून तो भाग जाळून 'जाळरेषा' तयार केली जाते. त्याद्वारे वणवा पसरण्यापासून रोखला जातो. वणवा लावणाऱ्यांविरोधात कारवाई होते.
जाळरेषा यासाठी महत्त्वाचीजाळरेषेमुळे वणवा जंगलात पसरत नाही. वनातील विविध प्रजातींच्या वनस्पतींचे संरक्षण होण्यास मदत होते. त्यामुळे वनविभागातर्फे जाळरेषा काढली जाते. विशेष म्हणजे, ३ मीटर, ६ मीटर, ९ मीटर, १२ मीटर आदी प्रकारानुसार जाळ रेषा आखली जाते.
वणवा लावणाऱ्यास कारावासाची तरतूदजंगलाला आग लावणाऱ्यास भारतीय वनअधिनियम १९२७ चे कलम २६ नुसार नुकसानीची किंमत आणि पाच हजार रुपये दंड व दोन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली जाते. मात्र, अनेकवेळा आग लावणाऱ्या व्यक्तीचे नाव उघड होत नाही वा पुढे येत नाही. त्यामुळे आग लावणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यामध्ये तांत्रिक अडचणी येताना दिसतात. रस्त्यालगत ३ मीटर जाळ रेषा काढली जाते. महामार्गाला लागून असलेल्या जंगलालगत ६ ते ९ मीटर जाळ रेषा काढली जाते. विशेष म्हणजे, जिल्हा सीमा, राज्य सीमेवर १२ ते १५ मीटर जाळ रेषा तयार करतात.